आगीत तीन संसार खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 10:13 PM2020-03-06T22:13:57+5:302020-03-06T22:14:07+5:30

फैजपूर येथील दुर्घटना : सुदैवाने जीवीतहानी नाही

Fire consumes three worlds | आगीत तीन संसार खाक

आगीत तीन संसार खाक

Next




फैजपूर : शहरातील रथगल्ली भागात राहणाऱ्या जैन कुटुंबाच्या घराला शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने या आगीत कुटुंबाचा संपूर्ण संसार बेचिराख झाला. सुदैवाने त्यात कोणतीच जीवितहानी झाली नाही .
रथ गल्ली मधील रिक्षाचालक किरण लीलाधर जैन तसेच त्यांचे नातेवाईक सुपडू जैन, पुष्पाबाई जैन व याकुबढ खान यांच्या जुन्या घराला सकाळी लागलेल्या आगीने थोड्याच वेळात रुद्ररूप धारण केले. पालिकेच्या २ व सावदा पालिकेचा अग्निशमन बंब यांनी तब्बल दोन ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत किरण जैन व त्यांचे नातेवाईक यांचे संसारोपयोगी वस्तू तसेच होळीच्या यात्रेनिमित्त विक्रीसाठी आणलेले कपडे, सामान तसेच रोख रक्कम टीव्ही, फ्रिज, शासकीय कागदपत्रे, धान्य, रोज वापरासाठी लागणारे कपडे संपूर्ण जळून खाक झाले तर भाडेकरू दीपक भावसार यांचे सामान व शेजारील या याकुब खान यांच्या घरातील मुलीच्या लग्नाचे कपडे व साहित्य सुद्धा जळाले त्यात त्यांचे एक लाखाच्या जवळपास नुकसान झालेले आहे तर जैन कुटुंबाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्याचा अंदाज काढणेही कठीण असल्याचे पंचनाम्यात नमूद केलेले आहे.
आगीची माहिती मिळताच प्रांताधिकारी अजित थोरबोले तहसीलदार जितेंद्रकुवर, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, मंडळाधिकारी बंगाळे यांनी घटनास्थळी भेट दिली तर तलाठी प्रशांत जावळे यांनी पंचनामा केला. माजी आमदार हरिभाऊ जावळे, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे, पी. के. चौधरी, नीलेश राणे, नगरसेवक हेमराज चौधरी, नसाका संचालक नरेंद्र नारखेडे, यांनीही भेटी दिल्या. पोलिसात आगीची नोंद घेण्यात आली आहे.
घरकुलासाठी प्रयत्न
आगीत पूर्णपणे बेचिराख झालेल्या जैन कुटुंबाच्या निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी तातडीने पंतप्रधान आवास योजनेतून त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जागेचे मोजमाप करण्यात आले व या परिवाराला हक्काचा निवारा मिळावा यासाठी या घरकुलाला प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचेही पालिका सूत्रांनी सांगितले
मुस्लिम तरुणांचाही पुढाकार
आगीची माहिती मिळताच गल्लीतील तसेच परिसरातील तरुण मंडळींसोबत मुस्लिम तरुणांनीही आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला. नगरसेवक कलीम मन्यार, केतन किरंगे, रईस मोमीन आदींनी सहकार्य केले.
काढली मदत फेरी
आगग्रस्त जैन कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी सायंकाळी शहरातून मदत फेरी काढण्यात आली. मदत फेरीत महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज, प्रवीण महाराज, माजी नगराध्यक्ष बी. के. चौधरी यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.
अग्निशमन केंद्रावरील कर्मचाऱ्यांना नोटिसा
घटनास्थळावरून हाकेच्या अंतरावर असलेले अग्निशमन केंद्रावर फोन लावून सुद्धा कर्मचारी फोन उचलत नव्हते तर काही जण स्वत: गेल्यावर तेथे कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी फायरमन रुबाब तडवी तसेच त्याचे सहकारी जुबेर खान, चंपालाल आदिवाल व संवेदनशील वक्तव्य करणारा अग्निशमन केंद्रावरील कर्मचारी हेमंत फेगडे या चार कर्मचाºयांना पालिकेतर्फे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Web Title: Fire consumes three worlds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.