भडगाव तालुक्यातील वाडे येथे घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 06:20 PM2019-06-08T18:20:10+5:302019-06-08T18:21:26+5:30
भडगाव तालुक्यातील वाडे येथील राजेंद्र भिकारी परदेशी यांच्या शेतातील कुडाच्या घराला अचानक आग लागून मुलीच्या लग्नाचा बस्ता, सोने तसेच दिड लाख रुपये रोख, ९० क्विंटल कांदा, ३ पोते धान्य, कपाशी बियाण्याच्या ६ थैल्या, कपडे, डाळी, १२ कोंबड्या, संसारोपयोगी वस्तू, मुलांचे व शेतीचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाल्या.
भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाडे येथील राजेंद्र भिकारी परदेशी यांच्या शेतातील कुडाच्या घराला अचानक आग लागून मुलीच्या लग्नाचा बस्ता, सोने तसेच दिड लाख रुपये रोख, ९० क्विंटल कांदा, ३ पोते धान्य, कपाशी बियाण्याच्या ६ थैल्या, कपडे, डाळी, १२ कोंबड्या, संसारोपयोगी वस्तू, मुलांचे व शेतीचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाल्या. ८ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यात सुमारे ७ लाखांचे नुकसान झाले.
आग लागल्याचे लक्षात येताच आजुबाजुचे शेतकरी, नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत बादल्यांनी पाणी मारुन आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत परदेशी यांचा सारा संसार जळून खाक झाला. परदेशी यांच्या मुलीचा लग्नसोहळा १५ जून रोजी असून, या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
आग लागली तेव्हा आई, वडील व मुलगी कामानिमित्त गावात गेलेले होते. शेतात मुलगा व दुसरी मुलगी घराबाहेर शेताचे काम करीत होते. तलाठी बी. डी. मंडले यांनी ७ लाख रुपये नुकसानीचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी पोलीस पाटील भूषण पाटील, कोतवाल आबा मोरे यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.