मुक्ताई सूतगिरणी परिसरात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 08:27 PM2020-05-09T20:27:15+5:302020-05-09T20:28:08+5:30
मानेगाव शेती शिवारात मुक्ताई सूतगिरणी परिसरात गवताला आग लागली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील मानेगाव शेती शिवारात मुक्ताई सूतगिरणी परिसरात गवताला आग लागली. यात सूतगिरणीला कोणतीही हानी झाली नाही. शनिवारी दुपारी तीनला ही घटना घडली.
सूतगिरणी शेजारी असलेल्या शेतीच्या बांधावरील काडी, कचरा शेतकऱ्याने पेटवला होता. यावेळी हवेचा वेग वाढल्याने जळालेले काही अवशेष मुक्ताई सूतगिरणीच्या आवारात असलेल्या गवतामध्ये जाऊन पडले. यातूनच गिरणीच्या आवाराला अचानक आग लागली. जवळपास अर्धा तास ही आग सुरू होती. यात परिसरातील गवत जळाले. हा प्रकार शेतकऱ्यांच्या व सूत गिरणीत असलेल्या कर्मचाºयांच्या लक्षात येताच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी तत्काळ वरणगाव फॅक्टरीतील अग्निशमन दलाला फोन केले. तीन वाजून वीस मिनिटांनी घटनेची माहिती मिळताच वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीतील अग्निशमन दलाने केवळ दहा मिनिटात घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलातील कार्यरक्षक व्ही.व्ही.कांबळे, अग्नी मार्गदर्शक डी.व्ही.पाटील, डी.पी.वानखेडे, ए.व्ही.बाळापूरकर, पी.व्ही.कुलकर्णी, एन.आर.वारके व एस.टी.जोहरे या अग्निशमन दलातील पथकाने कार्यतत्परता दाखवली. अन्यथा मोठी हानी झाली असती.
दरम्यान, आगीची घटना कळताच घटनास्थळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, अॅड.रोहिणी खडसे, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, नगराध्यक्ष नाजमा तडवी, भाजपचे सरचिटणीस संदीप देशमुख, योगेश कोलते, सुभाष पाटील, धनंजय एदलाबादकर, सुनील काटे व संचालक मंडळाने घटनास्थळी धाव घेतली.