शहर व ग्रामीण राष्ट्रवादीत गटबाजीचे फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:03+5:302021-05-19T04:16:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना काही प्रमाणात बळ दिले जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना काही प्रमाणात बळ दिले जात असतानाच, ग्रामीण व शहर राष्ट्रवादी अशा दोन गटांमध्ये सद्य:स्थितीत राष्ट्रवादी विभागली गेली असल्याने राष्ट्रवादीतील गटबाजी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. त्यात सोमवारी पेट्रोल दरवाढीविरोधात झालेल्या आंदोलनात ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी निर्धारित वेळेआधीच आंदोलन सुरू करून हे आंदोलन हायजॅक केल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढीविरोधात शहर राष्ट्रवादीने सोमवारी सकाळी १२ वाजता आंदोलनाची वेळ निश्चित केली होती. मात्र, या निश्चित वेळेआधीच ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात आघाडी घेत निर्धारित वेळेआधीच हे आंदोलन सुरू केल्याच्या आरोप शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबत वरिष्ठांकडेदेखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे. मंगळवारी राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलाविण्यात आल्याचीही माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे. यामध्ये या तक्रारीची दखल घेऊन संबंधित पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ नेते चर्चा करणार असल्याचीही माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे.
गटबाजीच्या ‘ग्रहणात’ अडकली राष्ट्रवादी
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्तेत असली तरी जळगाव शहर व ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीची स्थिती दयनीय आहे. त्यात जळगाव शहरात महापालिकेत राष्ट्रवादीला एकही नगरसेवक निवडून आणता आला नव्हता. अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षांपासून काही तरुण पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच, शहर व ग्रामीण असे दोन गट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा गटबाजीच्या ग्रहणात अडकलेली आहे. ग्रामीणचे आंदोलन ग्रामीण भागात, तर महानगरचे आंदोलन शहरी भागात होणे अपेक्षित होते. मात्र, हेव्यादाव्यांमुळे हे आंदोलन एकाच ठिकाणी घेण्यात आल्याने यामुळे पक्षाचीही बदनामी होत आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे.
कोट..
प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार केंद्राच्या पेट्रोल दरवाढीविरोधात दुपारी बारा वाजता आंदोलनाची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांनी कोणतीही पूर्वसूचना न देता निर्धारित वेळेआधीच आंदोलन सुरू केले. हे आंदोलन ग्रामीण भागात करणे अपेक्षित होते.
-अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे जिल्हा कार्यालय हे शहरातच आहे, तसेच कोरोनामुळे सकाळी ११ वाजेनंतर गर्दी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे हे आंदोलन निर्धारित वेळेआधीच करण्यात आले, तसेच याबाबत शहर महानगराध्यक्षांनादेखील सूचना देण्यात आल्या होत्या.
-ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, ग्रामीण.