फटाक्यांचे भाव यंदा स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:48 AM2018-10-24T11:48:47+5:302018-10-24T11:49:28+5:30
विविध प्रकारचे फटाके बाजारपेठेत दाखल
जळगाव : दिवाळीसाठी फटाके बाजारपेठेत दाखल झाले आहेत. इंधन दरवाढीमुळे विविध वस्तूंमध्ये भाववाढ होत असली तरी फटाक्यामध्ये कोणतीही भाववाढ न होता त्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील चीनचे फटाके विक्री न करण्याचा निर्धार विक्रेत्यांनी केला आहे.
साधारण ११० रुपयांपासून ते तीन हजार रुपये किंमतीचे फटाक्यांचे खोके (बॉक्स) बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहेत. लहान फटाके, रंगबेरंगी फटाके तसेच मोठे बॉम्ब असे विविध प्रकारचे फटाके असलेले हे बॉक्स सध्या आकर्षण ठरत असून त्या सोबतच सुट्या फटाक्यांनाही मागणी असल्याचा दरवर्षीचा अनुभव असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ९ वस्तूंचा गिफ्ट बॉक्स ११० रुपये, १८ वस्तूंचा बॉक्स २०० रुपये, २६ वस्तूंचा बॉक्स ३७५ रुपये, ३८ वस्तूंचा बॉक्स ६००रुपये व त्यापेक्षाही मोठे बॉक्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
चीनच्या फटाक्यांना यंदाही नकार
चीनच्या फटाक्यांची यंदाही विक्री केली जाणार नाही असा निर्धार जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशने केला असून बाजारपेठेत फटाके आले असले तरी त्यात चीनच्या फटाक्यांना स्थान देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले. या संदर्भात महाराष्ट्र फटाका असोसिएशनची पुणे येथेही बैठक झाल्यानंतर तशा सूचना देण्यात आले असल्याचे असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले.
विविध प्रकारचे फटाके वेधताहेत लक्ष
बाजारपेठेत दाखल झालेल्या फटाक्यांमध्ये फॅन्सी फटाके, विविध प्रकारचे रॉकेट तसेच फ्लॉवर पॉटमध्ये रंगीला, बो-बो, क्रॉकलिंग, मल्टी कलर पॉट तर चक्करमध्ये २५ शॉटस्, ५० शॉटस्, १०० शॉटस्, २०० शॉटस्, ५०० शॉटस् हे फटाके आकर्षण ठरत असून त्यांना जास्त मागणी असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीच्या १० दिवस अगोदर फटाके खरेदीसाठी दरवर्षी गर्दी होत असते, मात्र यंदा त्यापूर्वीच होलसेल विक्रीसह किरकोळ विक्रीस सुरुवात झाली आहे. यंदा दुष्काळी स्थिती जाणवत असली तरी मुलांचा हट्ट पुरविण्यासाठी फटाक्यांची खरेदी केली जात असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.
दिवाळीसाठी बाजारपेठेत विविध प्रकारचे फटाके बाजारपेठेत दाखल झाले असून यंदा फटाक्यामध्ये कोणतीही भाववाढ झालेली नाही. पाऊस कमी असला तरी मुलांसाठी पालकवर्ग फटाक्यांची खरेदी करीत असल्याने फटाक्यांना चांगली मागणी आहे.
- युसुफ मकरा, कार्याध्यक्ष, जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशन.