जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
By विजय.सैतवाल | Published: November 18, 2024 10:22 AM2024-11-18T10:22:51+5:302024-11-18T10:34:51+5:30
तीन राउंड फायर : पोलिस अधीक्षकांसह ताफा घटनास्थळी
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन शेख (५०, रा. शेरा चौक, तांबापुरा परिसर, जळगाव) यांच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला. यावेळी तीन राउंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत शेख यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. ही घटना सोमवारी पहाटे घडली. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.
एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन शेख हे विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव शहर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. शिक्षक असलेले शेख यांचे शेरा चौकामध्ये घर आहे. सोमवारी (१८ नोव्हेंबर) पहाटे घरातील सर्वजण साखर झोपेत असताना अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या घरावर तीन राऊंड फायर केले. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काच फुटल्या आहे.
मोठा आवाज झाल्याने कुटुंबीय जागे झाले त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्हीत घटना कैद
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात ही घटना कैद झाली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.