गोळीबाराची सुपारी; घडवायचे होते हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:38+5:302020-12-07T04:10:38+5:30

जळगाव : चाळीसगाव शहरात शेख मोहम्मद साबीर मोहम्मद गालीब उर्फ बबय्या (२५,रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव) याच्या हत्येबाबत कारागृहातून सुपारी देण्यात ...

Firing betel nut; The massacre was to take place | गोळीबाराची सुपारी; घडवायचे होते हत्याकांड

गोळीबाराची सुपारी; घडवायचे होते हत्याकांड

Next

जळगाव : चाळीसगाव शहरात शेख मोहम्मद साबीर मोहम्मद गालीब उर्फ बबय्या (२५,रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव) याच्या हत्येबाबत कारागृहातून सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी जळगाव शहरात माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार करणारा अरबाज दाऊद पिंजारी (२४,रा.हरिविठ्ठल नगर) याने घेतली होती अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. अरबाज याच्यासह त्याचा साथीदार शोएब शेख उर्फ माया अस्लम शेख (रा.चाळीसगाव) याच्याही रविवारी मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेर शेख उर्फ बबय्या व सुपारी देणारा मास्टरमाईंड हैदरअली आसिफअली सैय्यद या दोघांमध्ये ऑक्टोबर महिन्यात वाद झाला होता. एकमेकांवर प्राणघातक हल्ले झाले होते. त्यात शेख मोहम्मद उर्फ बबय्या याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा हैदरअली कारागृहात आला. तेथे त्याने शोएब याला सांगून बबय्या याचा गेम वाजवायचा आहे, जळगावच्या अरबाजशी संपर्क साधून त्याला सुपारी देण्याबाबत सूचविले होते. त्यानुसार शोएब याने अरबाज याच्याशी संपर्क साधून हत्यचे नियोजन केले.२६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता बबय्या हा त्याच्या मित्रांसोबत चाळीसगावात असताना एका दुचाकीवरुन शोएब व अरबाज आले. मागे बसलेल्या अरबाजने बबय्या याच्या डोक्यावर गोळीचा नेम धरला, हा प्रकार लक्षात येताच बबय्याने तो चुकविले व अरबाजने झाडलेली गोळी ही डोक्याऐवजी मांडीतून आरपार निघाली. वेळीच सावरल्याने बबय्याचा जीव वाचला, मात्र त्यात तो गंभीर जखमी झाला.

असा झाला गुन्ह्याचा उलगडा

१) गोळीबार करणाऱ्यांनी तोंड झाकलेले असल्याने ओळख पटली नाही. चाळीसगाव गोळीबाराची घटना पहिलीच असल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी गोळीबार करणारे जिल्ह्यातील गुन्हेगार कोण? याची माहिती काढण्याची सुचना केली. त्यानुसार एलसीबीचे कर्मचारी विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, रामकृष्ण पाटील व राहुल पाटील यांच्या मदतीने माहिती संकलित करण्यात आली. त्यात जळगावात माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार करणाऱ्या अरबाजचे नाव पुढे आले.

२) अरबाजची काही दिवसातील हालचाल तपासली असता संशय बळावला व तो घटना झाली त्या दिवसापासून फरार असल्याचे समजले. चाळीसगावचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सहायक निरीक्षक निसार सैय्यद, अशोक सुतार, दीपक पाटील, नीलेश पाटील व विनोद खैरनार यांचे पथक मालेगावच्या दिशेने तपास करीत असतानाच अरबाज हा धुळ्यात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन धुळे गाठले असता त्याच ठिकाणी अरबाज मिळून आला. त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच गिरणा डॅमजवळील पाईपलाईनमध्ये लपविलेले पिस्तुल काढून दिले. दुसरा साथीदार शोएब हा चाळीसगावच्या बाहेर येऊन तेथून दुसरीकडे पलायन करणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन रविवारी सकाळी एलसीबीच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली.

३) एस.पींनी केली दोन तास चौकशी

गोळीबार करणाऱ्या अरबाजची गुन्हेगारी पार्श्वभूमी व आताही हत्येसाठी सुपारी पाहता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी अरबाज याची दोन तास चौकशी केली. त्यात अनेक गंभीर प्रकार समोर आले. या चौकशीतून कारागृहात चालणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवरही लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतला.

Web Title: Firing betel nut; The massacre was to take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.