कासोद्याच्या जेलरवर पुण्यात गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:25 AM2018-07-08T01:25:56+5:302018-07-08T01:26:29+5:30

सुखरूप बचावले : घरी आई-वडिलांना भेटण्यासाठी रिघ

 Firing in Kasoda jail in Pune | कासोद्याच्या जेलरवर पुण्यात गोळीबार

कासोद्याच्या जेलरवर पुण्यात गोळीबार

googlenewsNext

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : सन १९९६ सालापासून कासोद्यात रहिवाशी असलेल्या मोहन सुभाष पाटील (३५) या जेलर तरूणावर पुण्यात येरवडा जेल परिसरात गुंडाकडून गोळ्या झाडून त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्या नशिबाने तो फसला. ते सध्या सुखरूप असले तरी घरी कासोदा येथे त्यांच्या आई-वडिलांना भेटून विचारपूस करण्यासाठी ग्रामस्थांची अक्षरश: रिघ लागली आहे. शनिवारी दिवसभर त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक, मोहनचे मित्र व समाजातील सर्व थरातून विचारपूस होत आहे.
मोहनचे वडील सुभाष पिराजी पाटील (मूळ रहाणार ब्राह्मणशेवगे, ता.चाळीसगाव) हे महाराष्ट्र वखार महामंडळात नोकरीला आहेत. त्यांची सन १९९६ साली कासोदा शाखेत बदली झाली. त्यावेळी मोहनने इयत्ता पाचवीत कासोदा विद्यालयात प्रवेश घेतला.
दहावीपर्र्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षण जळगाव व एरंडोलला घेतले. बी.एड.पण केले. कासोद्यात एका शाळेत सहा वर्षे बिनपगारी नोकरी केली. नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल आगारात कंडक्टर म्हणून दोन वर्षे नोकरी केली. पुढे जेलर म्हणून कॉल आला व मोहन जेलर झाला. कासोद्यातून जेलर होणारा मोहन कदाचित पहिलाच असावा. त्यामुळे मोहनचे त्यावेळी गावातून खूप कौतूक झाले होते.
मोहनने आपल्या सेवेत कणखर भूमिका आधीपासूनच घेतली. एक शिस्तबद्ध अधिकारी म्हणून मोहन पाटीलचे नाव आहे. कदाचित प्रामाणिकपणामुळेच गुंडांना हा अधिकारी नकोसा झाला असावा. परिणामी मोहन पाटील जेलच्या काही अंतरावरच असलेल्या घरून आॅफिसला पायी जात असताना त्यांच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या गेल्या. परंतु मारेकऱ्यांचा निशाणा चुकल्याने पाटील हे बचावले आहेत. नंतर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून आरोपींना २४ तासातच जेरबंद केले.
मोहन पाटील या भ्याड हल्ल्यानंतर अजिबात विचलीत झाला नाही. या घटनेनंतर त्यांनी आपले कर्तव्य बजावले. पत्नी व आई-वडिलांना धीर देत सुटी न घेता आपले दैनंदिन कामकाज सुरूच ठेवले आहे.

आमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला एसटीत नोकरी लागली. त्यावेळी त्याच्या गुणवत्तेवर व नंतर जेलरची नोकरीही गुणवत्तेवरच मिळाली. दहावीत तो गावातून पहिला आला होता. ग्रामस्थांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यामुळे भारावून गेलो आहोत. -सुभाष पाटील (मोहनचे वडील)

हल्ला झाल्यानंतर काहीच झाले नाही, अशी त्यांची वर्तणूक होती, असे घाबरायचे नसते, अशी माझी त्यांनी समजूत काढली. - साधना पाटील (मोहनची पत्नी)

Web Title:  Firing in Kasoda jail in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.