पहिल्याच दिवशी २५० जणांवर पोलिसांचा कायद्याचा दंडूका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:43 AM2021-02-20T04:43:27+5:302021-02-20T04:43:27+5:30
जळगाव : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला मास्क सक्तीचा केला आहे, इतकेच काय तर लग्न समारंभ ...
जळगाव : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला मास्क सक्तीचा केला आहे, इतकेच काय तर लग्न समारंभ व अंत्यविधीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी गुरुवारपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी जिल्हाभरात सायंकाळी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा दंडूका उगारला. २५० जणांकडून १ लाख १५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.
पोलीस दलाकडून दुपारपासूनच चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस वाहनातून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात होते. शहरात टॉवर चौकात पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, बहिणाबाई उद्यानाजवळ जिल्हा पेठचे निरीक्षक विलास शेंडे, खोटे नगरात महामार्गावर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रविकांत सोनवणे व अजिंठा चौकात एमआयडीसीचे प्रताप शिकारे आदी अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरले होते तर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा हे देखील पांडे चौकात स्वत: थांबून नागरिकांवर कारवाई करीत होते. चाळीसगाव परिमंडळात फक्त चारच जणांवर कारवाई झाली. जळगाव शहरात सर्वाधिक २०५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकट्या टॉवर चौकात १३५ जणांवर कारवाई झाली. काही ठिकाणी ५०० तर काही ठिकाणी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे यापुढेही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती चंद्रकांत गवळी यांनी दिली.
अशी आहे पोलीस स्टेशननिहाय कारवाई
जळगाव शहर : १३५
जिल्हा पेठ : २५
एमआयडीसी :२५
जळगाव तालुका : २०
रावेर : ४
यावल : १५
मुक्ताईनगर :१५
बोदवड :०५
वरणगाव : ०२
सावदा : ०४