लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी उत्पन्न आले निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:16 AM2021-04-11T04:16:08+5:302021-04-11T04:16:08+5:30
जळगाव आगार : दिवसभरात झाल्या फक्त १०० फेऱ्या जळगाव : कोरोनामुळे आधीच एस. टी. महामंडळाचे उत्पन्न आधीच निम्म्यावर आले ...
जळगाव आगार : दिवसभरात झाल्या फक्त १०० फेऱ्या
जळगाव : कोरोनामुळे आधीच एस. टी. महामंडळाचे उत्पन्न आधीच निम्म्यावर आले असताना, शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सध्या कोरोना काळातील सरासरीच्या उत्पन्नापेक्षा निम्मेच उतपन्न आले असल्याची माहिती आगार प्रशासनातर्फे देण्यात आली. प्रवाशांची संख्या कमी असल्याने आगार प्रशासनातर्फे फक्त १०० फेऱ्या करण्यात आल्या.
गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आता तर शनिवारी व रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे याचा एस. टी. महामंडळाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारपेठ बंद असल्याने परिणामी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जळगाव आगारातर्फे महत्त्वाच्या उत्पन्न मिळणाऱ्या मार्गांवरच बसेस सोडण्यात आल्या. त्यात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे दिवसभरात १०० ते १२५ फेऱ्या झाल्या. या सर्व फेऱ्यांचे उत्पन्न साडेतीन ते चार लाखांपर्यंत आले असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांच्या या लॉकडाऊनमुळे रविवारीही उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
इन्फो
-आगारातील एकूण बसेस १००
-पहिल्या दिवशी किती बसेस धावल्या ५०
- फेऱ्या किती १००
- साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले
इन्फो :
पहिल्याच दिवशी दोन लाखांचा तोटा
सध्या कोरोना काळात जळगाव आगार प्रशासनाला ६ ते ७ लाखांचे उत्पन्न येत आहे. कोरोनापूर्वी १० ते १२ लाखांच्या घरात उत्पन्न येत होते. दरम्यान, शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी फक्त साडेतीन ते चार लाखांच्या घरात उत्पन्न आले. त्यामुळे २ लाखांचा फटका महामंडळ प्रशासनाला बसला. तर रविवारीही जर एवढेच उत्पन्न आले तर महामंडळ प्रशासनाला चार लाखांचा फटका बसणार आहे.
इन्फो :
कोरोनामुळे ५० टक्के कर्मचारी कामावर
सध्या कोरोना मुळे बसफेऱ्या कमी असल्याने महामंडळ प्रशासनातर्फे चालक व वाहक कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती केली आहे. चालक व वाहक हे अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे त्यांना कर्तव्यावर नेहमी हजर राहणे क्रमप्राप्त आहे. मात्र, कोरोनामुळे फेऱ्या कमी होत असल्याने आगार प्रशासनातर्फे या चालक -वाचकांनाही ५० टक्के कामावर बोलविण्यात येत आहे.
इन्फो :
सध्या कोरोनामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून, दोन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे तर उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. मात्र, ज्या मार्गावर प्रवासी मिळतील, त्या मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी तत्काळ बसेस सोडत आहोत. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देता, येतील यावर नियोजन सुरू आहे.
दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी