शाळेचा पहिला दिवस : कुठे अश्रू... कुठे हसू... शिक्षकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:28 PM2019-06-18T12:28:38+5:302019-06-18T12:29:02+5:30
कुतूहल अन् आईवडिलांची प्रतीक्षा
जळगाव : बँडचा गजर, शिक्षकांनी केलेले औक्षण, गुलाबाच्या फुलांनी झालेले स्वागत, पहिल्याच दिवशी हातात मिळालेली नवी कोरी पुस्तके अन् हा दिवस आणखी आनंदी करायला मिळालेला गोड खाऊ़़़ अशा चैतन्यमयी वातावरणात शहरातील शाळा दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टयानंतर सोमवारी उघडल्या़ पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याची किलबिलाटासह शिक्षकांची चिमुरड्यांना रमविण्यासाठी सुरू असलेली धावपळ त्यातच बराच वेळ झाल्याने आई-वडिलांकडे जाण्यासाठी बालकांची होणारी घालमेल असे सारे वातावरण बघायला मिळाले़ नव्यानेच शाळेत गेलेल्या चिमुकल्यांना मात्र रडू कोसळले.
दरम्यान, ढोल-ताश्यांच्या गजरात होत असलेले स्वागत, ट्रॅक्टर, कार, बैलगाडीमधून काढलेली मिरवणुकीमुळे काही विद्यार्थ्यांना आपणच सेलिब्रेटी असल्याचा एक अनोखा फील देत होते.
शाळेचा पहिला दिवस असल्याने सकाळपासून शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची प्रचंड गर्दी होती. लहान मुलांचे रडणे, मध्येच पटांगणात पडणे सुरु होते. आईवडिलांना सोडून शाळेत जाण्यासाठी तयार नसलेल्या विद्यार्थ्यांना चॉकटेल व आईस्क्रिम दिले जात होते.
तर काही पालकांकडून लाडाने उचलून घेत का? याचा शोध घेत बसल्याचे चित्र पहिल्या दिवशी बघायला मिळाले़
जेवणाची सुट्टीनंतर सुरु झालेली शाळा पहिल्या सत्रापेक्षा थोडी चांगली वाटली. एरव्ही शांत राहणारे चिमुरडे आपल्या शेजारील मित्राची वॉटरबॅग, स्कूल बॅगकडे कौतुकाने पाहत होते. थोडा परिचय झाला, मैत्री झाल्याने सहकारी मित्रासोबत काही प्रमाणात बोलणे आणि खेळणे देखील सुरु झाले. शाळेच्या पहिल्या सत्रापेक्षा दुसरे सत्र मात्र आवडायला लागले.
आई-बाबांना मारली मिठी़़़
गणेश कॉलनी, एम़जे़ कॉलेज परिसर, जुने जळगाव परिसर, बी़ जे़ मार्केट परिसरातील शाळांबाहेर सकाळपासून पालकांनी प्रचंड गर्दी केली होती़ मुलांला शाळेत पाठविल्यानंतर तो रडत तर नसणार ही चिंता देखील पालकांना सतावत होती़मात्र, काही तासांनी शाळा सुटताच चक्क नवीन चेहऱ्यांनी भेदरलेल्या चिमुकल्यांनी आई-बाबांना पाहताच मिठी मारत आपल्या तुटक्या शब्दांमध्ये शाळांमधील अनुभव सांगितला़
रडू नकोस नां!
शाळेचा पहिला दिवस़़़उत्साह मात्र, वर्गात येताच आई-बाबांसमोर नसल्याचे पाहताच अनेक विद्यार्थ्यांनी रडणे सुरू झाले होते़ यातच रडक्या दोस्तमंडळींना डोरेमॉन- छोटा भीम दाखवून रडू नकोस ना, असं सांगण्यातही ही दोस्तमंडळी मागे नव्हती. अशा सर्वच गोष्टींमधून हे सगळं आपलंच आहे, अशी एक आगळीवेगळी भावना हे छोटे दोस्त एकमेकांशी शेअर करत असल्याचे शाळांमधून अनुभवायला मिळाले. शिक्षकही विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध क्लुप्त्या लढविताना दिसून आले़
रडणे, हसणे आणि धम्माल मस्ती
आई-बाबा नाही आणि वर्गात आपल्यासारखीच दुसरी बालके पाहून सुरुवातीला रडवेली झालेली चिमुरड्यांना शिक्षिकेकडून सांगण्यात येणारी गोष्ट आणि गाणी ऐकण्याशिवाय पर्याय नाही. सुरुवातीला रडणे मध्येच हसणे असे वातावरण सर्वच शाळांमध्ये दिसून आले. दरम्यान, यंदा शाळांमध्ये खेळणी, कार्टून्स तसेच विविध मंनोरंजनात्मक खेळ घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी धम्माल सुध्दा केली़