जळगावात तरुणीने परीक्षा देऊन बांधली जोडीदारासोबत आयुष्याची गाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:27 PM2018-04-21T12:27:47+5:302018-04-21T12:27:47+5:30
नववधूचे कौतुक
विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २१ - लग्नाची मुहूर्त ठरला अन् परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले, यात नेमके लग्नाच्याच दिवशी एका विषयाची परीक्षा आली. अशा परिस्थितीत काय करावे, या विचारात असताना शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देता जळगाव येथील कांचननगरातील भाग्यश्री अनिल आस्वाल या विद्यार्थिनीने हळदीच्या अंगाने परीक्षा देऊन नंतर लागलीच शुभमंगलसाठी उभे राहत जोडीदारासोबत आयुष्याची गाठ बांधली. या सुखद प्रसंगाचे व-हाडी मंडळींनीही स्वागत करीत नववधूच्या या निर्णयाचे कौतुक केले.
कांचननगरातील रहिवासी असलेली भाग्यश्री ही बी.ए.च्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेते. दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न करण्याचा निर्णय होऊन जळगाव तालुक्यातीलच दापोरा येथील गोपाल के-हाळकर या तरुणासोबत तिचा विवाह निश्चित झाला व विविह मुहूर्तदेखील ठरला.
मुहूर्त ठरलेला असताना परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आणि त्यात नेमके २० एप्रिल या विवाह मुहूर्ताच्या दिवशी मराठी विषयाचा पेपर आला. एकीकडे परीक्षा जवळ येण्यासह विवाह तिथीदेखील जवळ येत होती. या दरम्यान विवाहासाठी असणारी लगबग सुरू असताना भाग्यश्रीने बस्ता काढण्यापासून सर्व तयारी केली. तर दुसरीकडे परीक्षेचा अभ्यासही सुरू ठेवला.
२० एप्रिल विवाहाचा दिवस उजाडला, दुपारी १२ वाजता विवाह मुहूर्त आणि सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत परीक्षा. अशा वेळी भाग्यश्रीने परीक्षा देण्याची तयारी दाखविली व या वेळी तिचे मामा जितेंद्र वारुळकर व इतर नातेवाईकांनीदेखील तिला परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. त्यानुसार भाग्यश्री अंगाला हळद लागलेली असताना २० रोजी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहचली. परीक्षेला तर बसली मात्र लग्नघटिका समीप येत असताना एकीकडे नवीन आयुष्याची ओढ व आयुष्यातील परीक्षेचा महत्त्वाचा टप्पा अशा प्रसंगात भाग्यश्रीने शांततेने परीक्षा दिली.
या वेळी तिच्या सोबत प्रशांत अंबिकार, टिना अमोदकर, रोहन वारुळकर हे परीक्षा केंद्रावर आले होते. परीक्षा झाल्यानंतर भाग्यश्रीला घेऊन ते विवाहस्थळी पोहचले. तेथे वधूचा साज चढवून भाग्यश्री लग्नासाठी उभी राहिली आणि परीक्षेपाठोपाठ दापोरा ता. जळगाव येथील गोपाल के-हाळकर यांच्याशी आयुष्याची गाठ बांधली.