नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जळगावच्या नाटय़गृहात पहिला प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:35 PM2017-08-16T13:35:43+5:302017-08-16T13:36:56+5:30
चंद्रकांत पाटील : बंदिस्त नाटय़गृहाचे 1 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 16 - शहरवासीयांचे सुसज्ज व वातानुकुलित नाटय़गृहात नाटकाचे प्रयोग पाहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून येत्या 1 जानेवारी, 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या नाटय़गृहाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. तसेच याचदिवशी शहरवासीयांसाठी नाटकाचा पहिला प्रयोग ठेवण्यात येणार असल्याने त्यानुसार नियोजन करून संबंधित कंत्राटदारांनी नाटय़गृहाचे काम वेळेत पूर्ण करावे. अशा सूचना महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
शहरवासीयांना नाटकांची मेजवाणी मिळावी यासाठी मायादेवी नगर येथे 30 कोटी रुपये खर्चाच्या व 1200 आसन व्यवस्था असलेल्या सुसज्ज आणि वातानुकुलीत नाटय़गृहाचे काम 2013 पासून सुरु आहे. या नाटय़गृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून आतील छताचे व विजेचे काम बाकी आहे. छतासाठी लागणारे साहित्य दुबई येथून मागविलेले आहे. ते येत्या 15 दिवसात मिळणार आहे. ते मिळाल्यानंतर आतील छताच्या कामास किमान दोन महिने कालावधी लागणार असल्याची माहिती संबंधित कंत्राटदाराने दिली. हे काम पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिकल कामे पूर्ण करण्यासाठी एक महिना कालावधी लागणार असून त्यानंतर रंगरंगोटी, व अंतर्गत सुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी किमान साडेतीन ते चार महिने लागणार असल्याने ही सर्व कामे येत्या 15 डिसेंबरपयर्ंत पूर्ण होतील असे कंत्राटदारांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन असल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या बंदिस्त नाटय़गृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करुन त्याचदिवशी नाटकाचा पहिला प्रयोग ठेवून जळगावकरांना नवीन वर्षाची भेट देण्याची इच्छा यावेळी पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली. व त्यानुसार आवश्यक त्या कामांचे नियोजन करुन सर्व कामे वेळेआधी पूर्ण करण्याच्या सूचनांही त्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण नाटय़गृहाची पाहणी करुन पूर्ण झालेल्या तसेच सुरु असलेल्या कामाची माहिती घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच सर्व संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यासमोर नाटय़गृहाच्या आराखडय़ाचे सादरीकरण करण्यात आले.