कांग नदीला आला पहिल्यांदा पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By चुडामण.बोरसे | Published: September 2, 2022 08:17 PM2022-09-02T20:17:27+5:302022-09-02T20:18:04+5:30
जामनेरला अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान, शेतातही पाणी शिरले
जामनेर जि. जळगाव : तब्बल वीस दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावले. शहरात गुरुवारी रात्री अवघ्या काही तासात ५५ मिमी पाऊस झाला. वाकडी, लोणी, मादणी, मोयखेडे दिगर परिसरात वादळासह झालेल्या पावसाने अडीचशे हेक्टरवरील मका, कापूस व केळीचे नुकसान झाले आहे.
काही भागात पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनीवर पडून नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे कांग नदी वाहून निघाली. यंदाच्या पावसाळ्यातील कांग नदीला आलेला हा पहिला पूर होता. खडकी नदी व लहान मोठे नाले दुथडी भरून वाहू लागले. तळेगाव, मोयखेडे दिगर, कापूसवाडी, वाघारी परिसरातील शेतात पावसाचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक पाऊस जामनेरला ५५ मिमी झाल्याची नोंद आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेपासून सुरु झालेला पाऊस अकरा पर्यंत सुरूच होता.
महसूल विभागाकडे आलेल्या प्राथमिक अहवालानुसार पावसामुळे सुमारे २१० शेतकऱ्यांच्यापिकांचे नुकसान झाले. सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रातील कापूस, मका व केळी या पिकांचे नुकसान झाल आहे.
- प्रशांत निंबोलकर, नायब तहसीलदार, जामनेर.