धक्कातंत्राने गाजला निवडणुकीचा पहिला टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 04:43 PM2019-10-06T16:43:36+5:302019-10-06T16:44:25+5:30

एकनाथराव खडसे यांच्यासोबतच गटातील उदेसिंग पाडवी, अनिल गोटे, दिलीप कांबळे यांचीही तिकीटे भाजपने कापली, खान्देशातील यादीवर गिरीश महाजन यांचा वरचष्मा ; धुळ्याची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक

The first phase of elections in Gaza with shock | धक्कातंत्राने गाजला निवडणुकीचा पहिला टप्पा

धक्कातंत्राने गाजला निवडणुकीचा पहिला टप्पा

Next

मिलिंद कुलकर्णी
महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा राजकीय पक्षांनी वापरलेल्या धक्कातंत्राने गाजला. पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांच्याविरुध्द चार वर्षे जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या एकनाथराव खडसे यांना शेवटच्या दिवसांपर्यंत प्रतीक्षा करायला लावून तिकीट कापण्यात आले. कन्येला तिकीट दिल्याचे समाधान असताना खडसे गटाचे म्हणून समजल्या जाणाºया उदेसिंग पाडवी, दिलीप कांबळे आणि अनिल गोटे या आमदारांचीही तिकीटे कापली. संजय सावकारे मात्र बचावले. खडसे यांनी पक्षादेश मान्य केल्याने संभाव्य वादळ शांत झाले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे वेगळेपण प्रत्येक टप्प्यावर जाणवू लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना वगळता कोणत्याही पक्षाने जागावाटप जाहीर केलेले नाही. युती आणि आघाडी असल्याने कोणत्या जागा कोण लढवणार हे जागावाटपाने कळते. रणनीती म्हणून हा निर्णय झाला की, पक्षांमध्ये संभ्रम, गोंधळाचे वातावरण होते हे कळायला मार्ग नाही. पण उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यावर जागावाटप कळले. उमेदवारांच्या यादीवरुन जागांचा आढावा घेतला तर खान्देशातील २० जागांपैकी भाजप १४ तर शिवसेना ६, काँग्रेस ८ तर राष्टÑवादी १० आणि भुसावळची जागा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या पीरिपाला गेली आहे. धुळ्याची जागा आघाडीपैकी कोणताही पक्ष अधिकृत चिन्हावर लढवत नाही.
सर्व जागांवर उमेदवार देण्याचे दावे, स्वबळ अजमावण्याचा निर्धार, पक्षसंघटन मजबूत असल्याचे म्हणणे यात किती तथ्य होते, हे या पहिल्या टप्प्यात दिसून आले.
राजकीय पक्षांच्या अपरिहार्य धक्कातंत्राचा हा भाग म्हणावा लागेल. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना युतीमध्ये बंडखोरीचे प्रमाण मोठे आहे. ही बंडखोरी शमविण्याचे मोठे आव्हान, ज्यांचा उमेदवार यादीवर वरचष्मा आहे, त्या गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यापुढे आहे.
एकनाथराव खडसे आणि भाजप पक्षश्रेष्ठी यांच्यातील बुध्दिबळाचा डाव तीन दिवस चांगलाच रंगला. खडसे यांना तिकीट नाही, ही कुजबूज गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होती. अशीच कुजबूज लोकसभा निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी होती, पण ती फोल ठरली. तसेच विधानसभा निवडणुकीत घडेल, असा खडसे समर्थकांचा होरा होता. स्वत: खडसे यांनीच रोहिणी नव्हे, मीच पक्षाचा उमेदवार असे जाहीर करुन उमेदवारीवर दावा ठोकला होता. अधिकृत यादी जाहीर होण्यापूर्वी ‘मुहूर्ता’ची ढाल पुढे करुन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षापुढे पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भाजप आता वाजपेयी-अडवाणी यांच्या काळातील राहिलेला नाही, मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने तीन याद्या जाहीर करुन खडसेंना प्रतिक्षेवर ठेवले. ‘तुम्हाला तिकीट नाही, तुम्ही सूचवाल त्याला देऊ’असे त्यांनाच जाहीर करावे लागले. शेवटच्या दिवशी कन्या रोहिणीचे तिकीट जाहीर झाले. पक्षाने केवळ त्यांचेच तिकीट न कापता समर्थक असलेल्या उदेसिंग पाडवी, (शहादा), माजी मंत्री दिलीप कांबळे (पुणे), अनिल गोटे (धुळे) यांचीही तिकीटे कापून मोठा धक्का दिला. पक्षाच्या भूमिकेची कल्पना आल्याने खडसे यांनीही नमते घेत कन्येची उमेदवारी स्विकारली. अपक्ष किंवा राष्टÑवादी हे पर्याय असूनही त्यांनी ते नाकारले. भाजपमधील वाद तूर्तात शमले, असे म्हणावे लागेल.
धुळे शहर मतदारसंघात भाजपकडे अनेक मातब्बर इच्छुक असताना हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक म्हणावा लागेल. आघाडीत जळगाव आणि भुसावळ जागांविषयी निर्णय चकीत करणारा आहे. अर्थात पडद्याआड काय घडले आहे, हे काही काळानंतर बाहेर येईल. पण आता तरी या निर्णयाचा परिणाम जाणवणार आहे. सोमवारी माघारीची मुदत संपल्यानंतरच खºया अर्थाने सर्व २० मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. तेथील लढती निश्चित होणार आहे.

Web Title: The first phase of elections in Gaza with shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.