पहिल्याच पावसात गोपिका नदी तुडूंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 07:23 PM2018-07-13T19:23:50+5:302018-07-13T19:24:15+5:30
दहिवद : गोपिका नदीत जलपूजन, साडी, चोळी अर्पण, नागरिकांनी केला जल्लोष
अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील दहिवद येथे नदी-नाले खोलीकरण केल्याने पहिल्याच पावसात गोपिका नदी तुडुंब भरून वाहू लागली. ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे फळ मिळाल्याने आनंद व्यक्त करून जलपूजन केले.
गावाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काही तरुणांनी गावाचा विकास करण्याचा विडा उचलला. त्यात त्रिसूत्री कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. जलयुक्त शिवार, शिक्षण व वृक्षारोपण असे नियोजन करण्यात आले.
जलयुक्त शिवार या योजनेत गाव समाविष्ट व्हावे, यासाठी मुंबई येथे कार्यरत असणारे जयवंत पाटील यांनी प्रांताधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून गाव जलयुक्त शिवारात समाविष्ट करून घेतले. शिक्षण क्षेत्राची व गावातील व्यायामशाळेच्या कामाची धूरा विनोद पाटील यांनी तर वृक्षारोपणाचे काम पंकज पाटील व धर्मवीर भदाणे तत्कालीन ग्रामसेवक संजय पाटील यांच्या सहकार्य लाभले.
जलयुक्त शिवाराअंतर्गत गावात सहा सिमेंट बांध, एक दगडी बांधाचे खोलीकरण, लघु पाटबंधारे विभागामार्फत तीन सिमेंट बांध, भूजल विभागामार्फत गाव विहिरीजवळ खोलीकरण अशी कामे करण्यात आलीत. त्यात गावातील राजकीय लोकांनी त्यांना पाठबळ दिले पण पंकज पाटील, गोकुळ माळी, प्रशांत भदाणे, प्रवीण गुलाबराव माळी, बबलू व शिवाजी पारधी यांची मदत झाली.
जलयुक्त शिवारचे काम पूर्ण झाल्यानंतरदेखील दोन वर्षांपासून गावात वरूणराजाने कृपादृष्टी केलेली नसल्याने जलयुक्त शिवारातील कामांचा फायदा गावकऱ्यांना होत नव्हता. गावात लागवड केलेली २२०० झाडे २० ते २५ फुट उंचीचे झालेली असतानादेखील पर्जन्य खेचून आणण्यात त्यांचा फायदा होत नाही का, असा नकारात्मक सूर जनतेतून उमटत होता. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या अर्ध्या तासाच्या पावसाने काही मिनिटातच सर्व बांध भरून वाहू लागले. ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सततच्या पाच वर्षांपासून दुष्काळामुळे कोरडी असणाºया गोपिका नदीला यावर्षी आलेल्या पुराच्या पाण्याचे पूजन करण्यात आले व साडी, चोळी अर्पण करण्यात आली. त्यावेळी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.