जामनेर येथे पहिले राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:44 AM2018-12-31T01:44:31+5:302018-12-31T01:47:15+5:30
पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते.
जामनेर, जि.जळगाव : पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते.
ग्रंथदिंडीत अग्रभागी संत गाडगेबाबांच्या वेशातील कार्यकर्ता रस्ता सफाई करीत होता. बैलगाडीवर बसलेली अस्मिता चौधरी ही बहिणाबाईच्या वेषात जात्यावर दळण दळत होती. दिंडीतील पालखीत ठेवलेल्या ग्रंथाचे व संविधानाचे पूजन नगरसेविका संध्या पाटील व जितेंद्र पाटील यांनी केले. दिंडीत न्यूू इंग्लिश स्कूल, बोहरा सेंट्रल, एकलव्य प्राथमिक, ज्ञानगंगा, खादगाव जि.प. शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीत दीपक पाटील, नाना लामखेडे, सुधाकर माळी, डॉ. प्रशांत भोंडे, जितू गोरे, चंद्ररकांत मोरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. स्वातंत्र सेनानींच्या वेशभूषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. ग्रंथ दिंडीच्या सुरुवातीला संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. दिंडीत घोड्यावर बसलेल्या पारंपपरिक पोषाख घातलेल्या मुली लक्ष वेधून घेत होत्या.
लोकजागर व गोंधळ
तावडी बोली साहित्य संमेलनात उद्घाटन सत्रानंतर लोकजागर व गोंधळ हा पारंपरिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तळेगाव, ता.जामनेर येथील जय वाल्मीकी जनजागरण कलापथक मंडळाचे सदस्य अर्जुन कोळी, राहुल मगरे, नितीन कोळी, पंकज चौधरी, किरण कोळी, देवानंद कोळी यांनी लोकगीत सादर केले.
सोयगाव, जिल्हा औरंगाबाद येथील जय वाल्मीकी पचरंग कलापथक मंडळातील योगेश साळवे, दिनेश निकम, शिवाजी अस्वार, गणेश इंगळे, प्रभाकर राऊत व प्रभाकर धनगर यांनी लावणी सादर केली.
‘तावडी रत्नां’चा सत्कार
तावडी बोली साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात पद्ममश्री ना.धों.महानोर व संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील यांच्या हस्ते ‘तावडी रत्न’ जाहीर झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात एकनाथ देशमुख, मधुकर पांढरे, दिलीप देशपांडे, रवींद्र पांढरे, बद्रीप्रसाद शर्मा, शिवदास पाटील, विठ्ठल काळे, रमेश महाजन यांना स्मृतीचिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुस्तकांचे झाले प्रकाशन
साहित्य संमेलनात डॉ.अशोक कौतिक कोळी यांचे तावडी बोली, डॉ.प्रकाश सपकाळे यांचे तावडी माटी, प्रमोद पिवटे यांचे पंचायत व गजानन कुलकर्णी यांचे गंधवेड्या लहरी या पुस्तकांचे प्रकाशन महानोर यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांनी केले.
परिसंवादात आली रंगत
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘तावडी बोली : महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा’ या विषयावर झालेल्या वक्त्यांनी रंगत आणली.
परिसंवादात डॉ.शशिकांत पाटील (जालना), प्रा.डॉ.नितीन दांडेकर (एरंडोल), प्रा.डॉ.संदीप माळी (जामनेर), प्रा.समाधान पाटील (भुसावळ), प्रा.गणेश सूर्यवंशी (जळगाव), प्रा.किरण पाटील (जामनेर) यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी नाहाटा महाविद्यालयातील प्रा.डॉ. प्रकाश सपकाळ होते. प्रा.पुरुषोत्ततम महाजन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. अक्षय घोरपडे यांनी आभार मानले.