जळगावातील विद्यार्थ्याची प्रतिकुलतेवर मात करीत डॉक्टरीकडे पहिले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:37 PM2018-06-28T12:37:09+5:302018-06-28T12:51:55+5:30
गेल्या वर्षीच्या कमी गुणांनी खचून न जाता यंदा घेतली भरारी
जळगाव : वेळेनुसार छोटी-मोठी कामे करून पत्नी, दोन मुलांचा उदरनविर्वाह करणारा पती व शिवणकाम करून त्यास हातभार लावणारी पत्नी अशा प्रतिकूल परिस्थितीत महागडे शिक्षण घेऊन डॉक्टर होणे दुरापास्तच. मात्र त्यावर मात करीत मिलन घनश्याम पोपटाणी या विद्यार्थ्यांने गेल्या वर्षी ‘नीट’ परीक्षेत मिळालेल्या कमी गुणांनी खचून न जाता यंदा पुन्हा यापरीक्षेला सामोरे जात चांगले गुण मिळवत डॉक्टरीकडे पहिले यशस्वी पाऊल टाकले आहे.
मू.जे. महाविद्यालयात विज्ञान शाखेतून शिक्षण घेणाऱ्या मिलन पोपटाणी या विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती नाजूक असली तरी मिलनचे आई-वडील मुलाला व मुलीला चांगले शिक्षण देण्यासाठी मोठे परिश्रम घेत असून मुलाला डॉक्टर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यानुसार मिलनने इयत्ता बारावीमध्येच आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनत घेत ९३.२३ टक्के गुण मिळवित जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मानही मिळविला. त्यानंतर त्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ची परीक्षाही दिली. मात्र त्या वेळी नेमके त्यास केवळ ३३९ गुण मिळाले. त्यामुळे त्याला एमबीबीएसला प्रवेश मिळणे शक्य नव्हते.
खचून न जाता पुन्हा परीक्षा
गेल्या वर्षीच मिलनला बीएएमएसला प्रवेश मिळत होता. मात्र आपल्याला आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी एमबीबीएस डॉक्टरच व्हायचे असल्याच्या निश्चयाने त्याने एक वर्षाचा गॅप घेत चांगली तयारी केली. या वेळी मोठे परिश्रम घेत यंदा पुन्हा ‘नीट’ची परीक्षा दिली व त्यात ५५६ गुण मिळवित एमबीबीएस प्रवेशाकडे पहिले यशस्वी पाऊल टाकले.
यश मिळाले, मात्र शासकीय शुल्क भरणेही कठीण
‘नीट’ परीक्षेत चांगले गुण तर मिळाले व त्यानुसार राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणेही शक्य आहे. असे असले तरी शासकीय महाविद्यालयाचेही शुल्क भरणे कठीण वाटत असल्याने आता काय करावे असा प्रश्न मिलन समोर पडला. मुळात कुटुंबाचे कसेबसे ५० हजार रुपये वार्षिक उत्पन्न असताना ७८ हजार रुपये प्रवेश शुल्क कसे भरावे, असा प्रश्नही त्याच्या वडिलांसमोर पडला. मात्र तरीही मिलनने हार मानली नाही व प्रवेशासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. त्यानुसार त्याला त्यात यशही आले असून प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क त्याच्यासाठी उपलब्ध झाले आहे.
मदतीसाठी सरसावले हात
वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने २७ जूनपासून महाविद्यालयाची निवड करायची आहे व ४ जुलैपासून महाविद्यालयांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रक्रिया जवळ येऊ लागल्याने मिलनने शहरातील आर्या फाउंडेशनशी संपर्क साधत सर्व परिस्थिती मांडली. त्यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सर्व खात्री करून शहरातील डॉक्टर मंडळींना विनंती केली व त्यानुसार डॉक्टरांनी तत्काळ मदत करीत मिलनच्या प्रवेश शुल्कासाठी ७८ हजार रुपये जमा केले. त्यानुसार फाउंडेशनच्यावतीने मिलन व त्याच्या कुटुबीयांकडे मंगळवारी ७८ हजार रुपयांचा धनादेश स्वाधीनदेखील करण्यात आला. या वेळी डॉ. राहुल महाजन, डॉ. अजय शास्त्री, डॉ. अनुप येवले, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. राहुल महाले आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे दात्यांच्या मदतीने प्रत्येक वर्षाचे शुल्क फाउंडेशन भरणार असल्याची ग्वाही डॉ. धर्मेंद पाटील यांनी पोपटाणी कुुटुंबास दिली.
गेल्या वर्षी ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एमबीबीएसला प्रवेश मिळू शकला नाही. मात्र डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असून त्यासाठी मी यंदा पुन्हा ‘नीट’ परीक्षा दिली. प्रवेशासाठी मला आर्या फाउंडेशनकडून मदत मिळाल्याने मोठा आधार झाला.
- मिलन पोपटाणी, विद्यार्थी.
हुशार व होतकरू विद्यार्थी केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांनी पुढे जावे यासाठी मदत केली. इतरही होतकरु विद्यार्थ्यांना मदत करण्याचा फाउंडेशनचा मानस आहे.
- डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन