पहिले हजार रुग्ण ७६ दिवसात, ३२ दिवसात वाढले ४ हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:02 PM2020-07-10T12:02:24+5:302020-07-10T12:02:36+5:30
चिंताजनक : लॉकडाऊननंतर दररोज वाढताहेत सरासरी ४६ रुग्ण
अजय पाटील ।
जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ५ हजारांपर्यंत पोहचली आहे. २४ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा वेग काही प्रमाणात मर्यादित होता. मात्र, १ जून रोजी जाहीर झालेल्या पाचव्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात १ हजार रुग्ण व्हायला ७६ दिवस लागले होते. मात्र, १ हजार ते ५ हजार रुग्णसंख्या व्हायला केवळ ३२ दिवस लागले आहेत. शेवटच्या ३२ दिवसात जिल्ह्यात तब्बल ४ हजार नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे शेवटच्या पाच दिवसात जिल्ह्यात २०० च्या सरासरीने रुग्ण वाढले आहेत.
कोरोनाची संख्या वाढत असल्याने जळगाव, भुसावळ व अमळनेर या तीन शहरांमध्ये सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत रुग्णवाढीचा संख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही.
छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड या राज्यापेक्षाही जिल्हा पुढे
जळगाव जिल्ह्यात सध्यस्थितीत (९ रोजी सायंकाळपर्यंत) ५ हजार १० इतके रुग्ण आहेत. जळगाव जिल्ह्यापेक्षा देशातील झारखंड,त्रिपुरा, गोवा, छत्तीसगढ व उत्तराखंड सारखे राज्यही मागे आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जळगाव जिल्हा आठव्या स्थानावर आहे. रुग्णवाढीचा दर याचवेगाने कायम राहिल्यास केरळ व पंजाब या राज्यांनाही जळगाव जिल्हा मागे टाकण्याची भीती आहे. जिल्ह्यातील वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या आता प्रशासनासाठी व जिल्ह्यातील नागरिकांसाठीही चिंतेचा होत जात आहे.
मृत्यूंची संख्याही तीनशे पार
जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीसोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ९८३ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्यस्थितीत १ हजार ७२६ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक उपचार हे जळगाव शहरात सुरू आहेत. भुसावळ, जळगाव, अमळनेर या शहरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत जाणारा संसर्ग प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. तसेच नागरिक अजूनही सोशल डिस्टन्सिंगच नियम पाळताना दिसून येत नाहीत.