४५ वर्षात प्रथमच आकाशवाणीचे प्रक्षेपण केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:34+5:302021-06-06T04:13:34+5:30
जळगाव : ‘नमस्कार श्रोते हो...’ अशा मंजुळ आवाजाने जळगाव आकाशवाणी केंद्र खान्देशवासीयांना भल्या पहाटे जागविते. दिवसाची सुरुवात ‘विचारपुष्प’ने करते. ...
जळगाव : ‘नमस्कार श्रोते हो...’ अशा मंजुळ आवाजाने जळगाव आकाशवाणी केंद्र खान्देशवासीयांना भल्या पहाटे जागविते. दिवसाची सुरुवात ‘विचारपुष्प’ने करते. ज्यामुळे लाखो श्रोत्यांचा दिवस आनंदाने जात असताना चार दिवसांपूर्वी शिरसोली येथील जळगाव आकाशवाणी प्रक्षेपण केंद्राच्या इमारतीला लागलेल्या आगीत केंद्रातील अनेक उपकरणे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे चार दिवसांपासून हे प्रक्षेपण केंद्र बंद पडले आहे. विशेष म्हणजे आकाशवाणीच्या ४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच असा प्रकार घडला आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी आकाशवाणीच्या शिरसोली येथील प्रक्षेपण केंद्राला लागलेल्या आगीत प्रक्षेपणाची विविध उपकरणे, संगणक रूम व इतर अनेक तांत्रिक साहित्य जळाले. गेल्या ४५ वर्षांत ऊन, वारा, वादळ किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती असो, कधीही आकाशवाणी केंद्रावरच एकही कार्यक्रम किंवा प्रक्षेपण केंद्र बंद पडले नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
अन् लाखो श्रोत्यांच्या मनोरंजनावर विरजण
जळगाव आकाशवाणी केंद्राचे जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातही प्रक्षेपण असते. सकाळच्या विचारपुष्प या कार्यक्रमानंतर राज्य शासनाचा दिलखुलास कार्यक्रम, त्यानंतर चित्रगीत, ‘झुबंर’ कौटुंबिक मालिका, शेतीजगत, संगीत रंजनी, चित्रगीत, युवावाणी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांची मेजवानी आकाशवाणी केंद्रावरून सुरू असते. इतकेच नाही तर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी मराठी व हिंदीतून बातम्या लागत असल्यामुळे, आजही खान्देशात आकाशवाणी केंद्राचे स्थान कायम टिकून आहे. मात्र, एका आगीच्या घटनेमुळे पहिल्यादांच हे केंद्र बंद पडल्यामुळे श्रोत्यांना त्यांचा दिनक्रमही चुकल्यासारखा वाटत आहे.
इन्फो :
प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न
चार दिवसांपासून बंद असलेल्या आकाशवाणी केंद्राच्या प्रक्षेपणाबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने येथील प्रक्षेपण अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी पुन्हा आकाशवाणीचे प्रक्षेपण सुरू करण्यासाठी बाहेरून तांत्रिक कर्मचाऱ्यांची टीम आली आहे. ही टीम युद्ध पातळीवर काम करत आहे. त्यामुळे लवकरच हे प्रक्षेपण केंद्र सुरू होणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.