गणेशोत्सवात कोरोनामुळे ७२ वर्षात पहिल्यांदा मूर्तिकारांंवर कोसळले संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 12:10 AM2020-08-23T00:10:44+5:302020-08-23T00:13:29+5:30
किरण चौधरी रावेर : कोरोनाच्या महामारीमुळे मध्य प्रदेशातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर घातलेले निर्बंध व महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना चार ...
किरण चौधरी
रावेर : कोरोनाच्या महामारीमुळे मध्य प्रदेशातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर घातलेले निर्बंध व महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना चार फूट उंचीपेक्षा जास्त उंचीच्या घातलेल्या निर्बंधामुळे तब्बल ५ फुटांपासून १८ ते २० फुट उंचीच्या सुबक, मनमोहक व बदलत्या काळाच्या ओघात चालू धार्मिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात येणाऱ्या चित्ताकर्षक श्री विघ्नहर्त्या गणरायाच्या मूर्र्तींचा मोठा व्यवसाय बुडाला आयुष्यातील ७२ वर्षात मूर्तिकारांवर पहिल्यांदाच ६० ते ७० टक्के उत्पन्न बुडाल्याची खंत रावेर तथा बºहाणपूर येथील मोरे आर्टस प्रतिष्ठानचे संचालक तथा मूर्तिकार राजेश मोरे यांनी ‘लोकमत’ला मुलाखत देताना व्यक्त केली.
मध्य प्रदेशातील इंदूरपासून तर महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ व खान्देशासह ते हवाई मार्गाने थेट दुबईतील श्री गणेशभक्तांच्या मनाचा ठाव घेणाºया मोरे आर्टस प्रतिष्ठानचे संचालक तथा मूर्तिकार राजेश मोरे यांची घेतलेली मुलाखत.
प्रश्न : आपण मूर्तीकला व्यवसायात कसे वळलात?
उत्तर : बºहाणपूर या कला आराधना जोपासणाºया शहरात आजोबा देवचंद मोरे, वडील बाबूराव मोरे यांनी जोपासलेल्या मूर्तीकलेचा परंपरागत वारसा जोपासत मूर्तीकलेकडे वळलो. या परंपरांगत मूर्तीकलेला मुंबईच्या जे जे स्कूल आॅफ आर्टसमध्ये पदवी संपादन करून दिल्ली येथे शासकीय म्युझियममध्ये सेवारत असलेल्या दिवंगत थोरले भाऊ अशोक मोरे यांचे मूर्तीकलेतील तंत्र कौशल्य अवगत करून या अभिजात मूर्तीकलेला आजही चौथ्या पिढीतील माझ्या पदवीधर असलेल्या चौघाही मुलांच्या योगदानातून नवा आयाम देण्याचा प्रयत्न करीत असतो.
प्रश्न : आपल्या निमाड प्रांतातील मूर्तीकलेची नाड मराठी मातीतील मराठी मनाशी कशी जुळली?
उत्तर : आमचा पिढीजात व अभिजात मूर्तीकलेची नाड जन्मत: मराठी मातीशी जुळली आहे. आई मनाबाईचे माहेर अमरावती येथील आहे. वडिलांनी मूर्तीकला व्यवसायासोबतच फरसाण विक्रीच्या माध्यमातून रावेर शहराशी ऋणानुबंध जोपासले होते. किंबहुना थोरल्या भाऊंनी घेतलेले कलेचे शिक्षण मुंबापुरीतील सर जे.जे. स्कूल आॅफ आर्टसमध्येच घेतल्याने अंगी असलेल्या अभिजात कलेला नवीन आयाम लाभल्याने मूर्तीकलेतील जिवंतपणा हा थेट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साम्राज्यशाली इंदूरपासून ते थेट खान्देश, विदर्भ, मराठवाडा नव्हे तर सातासमुद्रापार दुबईतील गणेशभक्तांशीही अभिजात नाळ जुळल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
प्रश्न : विघ्नहर्ता गणाधीश व आदिशक्ती जगदंबेचे नानाविध रूपकं साधताना भक्तांची अभिरुची आपण कशी न्याहाळत असतात?
उत्तर : श्री गणेशभक्त वा दुर्गाभक्तांमध्ये साधारणपणे श्रावण मासाची लगबग सुरू होताच गणेशोत्सव व दुर्गाेत्सवाचे डोहाळे लागतात. मात्र आम्ही नवरात्रोत्सव आटोपल्यानंतरच आगामी गणेशोत्सवाचे वेध घेऊन मूर्तीकलेच्या वर्षभराच्या उपासनेला लागतो. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथील गणेशोत्सवात व दुर्गाेत्सवात भाविकांनी कोणत्या रूपकांना पसंती दिली? तेथील मूर्तीकलेतील झालेले बदल, भाविकांवर एखाद्या धार्मिक, सिने वा टीव्हीवरील एखाद्या मल्हार मार्तंड, राजे छत्रपती शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण वा भगवान दत्तात्रेय यांच्या रूपकातील पात्राचा ठसा उमटला काय? व सद्य:स्थितीत अयोध्यातील श्रीराम मंदिर भूमिपूजनासारख्या प्रभावशाली घटनांचा आपल्या मूर्तीकलेत प्रतिबिंब उमटवण्यासाठी फायबर मोल्डचे साचे तयार करून नानाविध रूपक साधण्यासाठी मूर्तीकलेची वर्षभर केलेली उपासना भाविकांच्या मनाला साद घालण्यासाठी समर्पक ठरत असते.
प्रश्न : मूर्तीकलेची आपण श्रध्देने वर्षभर उपासना करतात तर त्या श्रध्देचे व्यवहारात रूपांतर करताना आपले काय समीकरण असते?
उत्तर : मूर्तीकला ही जीवनचरितार्थ चालवणारी कला असली तरी मी व माझा परिवार श्रध्देने त्याकडे धार्मिक उपासना तथा भक्ती आराधना म्हणून पाहतो. वर्षभर आपल्या श्रध्दापूर्वक मूर्तीकलेच्या उपासनेतून भाविकांचे सकल मनोरथ साकारण्यासाठी देवत्व प्राप्त करणारी मूर्ती घडवणे हे ‘श्रीं’ची ईच्छा असल्याखेरीज शक्यच नाही. भाविकांना प्रसन्नचित्त करणारा मूर्तीचा मनोहारी चेहरा, मूर्तीचा पेहराव, मूर्तीची अभिव्यक्ती व आपल्या नजरेत नजर मिळवणारी नेत्रांची कलारूपकता या बाबींवर मुलगा सुनील, अक्षय, राहुल व मिलिंद या मुलांनी या बाबींवर प्रावीण्य मिळवले आहे. तथापि, ही कलेची उपासना साधून व्यवहारात परावर्तित करताना मूर्तीला लागलेल्या रकमेवर जास्त नफेखोरी न करता भाविकांनी नाराज न होता त्या कलेचे मूल्य प्रदान करावे हेच समीकरण आम्ही साधले आहे.
प्रश्न : कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या मूर्तीकला व्यवसायावर कोणते दुष्परिणाम जाणवले?
उत्तर : कोरोनाच्या महामारीमुळे मध्य प्रदेशात सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले गेल्याने तथा महाराष्ट्रात चार फूट उंचीपेक्षा जास्त उंचीच्या मूर्र्तींवर निर्र्बंध घातल्याने वर्षभरापासून केलेल्या पाच फुटांपासून १८ ते २० फूट उंचीपर्यंत केलेल्या २५० ते ३०० मूर्र्तींवर केलेला खर्च व परिश्रमावर पाणी फेरले. किंबहुना, चार फुटांंपासून २० फुटांपर्यंत विविध भावमुद्रेतील गणेश मूर्तींची सार्वजनिक मंडळांकडून होणारी मागणी घटल्याने दरवर्षीप्रमाणे होणाºया मूर्ती विक्रीच्या व्यवसायात तब्बल ७ ते ८ लाख रुपयांचे ६० ते ७० टक्के उत्पन्न यंद कोरोनाच्या महामारीमुळे बुडाले आहे. माझ्या ७२ वर्षांच्या आयुष्यात विघ्नहर्त्याच्या गणेशोत्सवासारख्या भाविक भक्तांच्या उत्सवावर कोरोनाचे विघ्न कोसळल्याचे भीषण संकट पहिल्यांंदाच पाहायला मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.