तब्बल सात वर्षानंतर पहिल्यांदाच जळगाव शहराचा पारा ६ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:41 PM2018-12-30T12:41:46+5:302018-12-30T12:42:16+5:30
थंडीच्या लाटेने जळगावकर गारठले
जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहरात थंडीची लाट पसरली आहे. सलग पाचव्या दिवशी शहराचे किमान तापमान ८ अंशापेक्षा कमी असून, शनिवारी किमान तापमानाने यंदाचा सर्वात निच्चांक गाठला होता. किमान पारा ६ अंशापर्यंत खाली घसरल्याने तब्बल सात वर्षांनंतर जळगावचा पारा ६ अंशावर आला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
याआधी २०११ मध्ये जळगावचे किमान तापमान ३ अंशावर गेले होते. २०११ मध्ये सलग आठवडाभर जळगावचा पारा ३ ते ७ अंशादरम्यान कायम होता. मात्र, त्यानंतर याच वर्षी किमान पारा ६ अंशावर आला आहे. २०१२ मध्ये जानेवारी महिन्यात ७, २०१३ डिसेंबर महिन्यात ७.४ अंशापर्यंत किमान पारा घसरला होता.
मात्र, यावर्षी तापमापीतील पारा सात वर्षानंतर पहिल्यांदाच ६ अंशावर आला आहे. दोन दिवसांपासून तापमान ६ अंशावर कायम असल्याने जनजीवनावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. पहाटे फिरायला जाणाºयांची संख्याही रोडावल्याचे दिसते. तर रात्रीही रस्ते लवकर सुनसान होतात.
थंडीचा जोर कायम राहणार
थंडीची लाट अजून तीन दिवस कायम राहणार असून किमान तापमान १० अंशाच्याच खाली राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. सध्या सरासरी तापमानापेक्षा तब्बल ५ अंशांनी तापमानाचा पारा खाली आला आहे. किमान तापमानासह कमाल तापमानात देखील लक्षणीय घट झाली आहे. शनिवारी शहराचे कमाल तापमान २५ अंश इतके होते. त्यामुळे दिवसा देखील गारवा जाणवत होता. सायंकाळी ७ वाजेनंतर कडाक्याचा थंडीमुळे नागरिक घराबाहेर निघणे टाळत असल्याने मुख्य रस्ते ८ वाजेनंतर ओस पडत आहेत. तसेच रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अतीथंडीमुळे वृध्दांना अधिक त्रास होत आहे.
शेकोट्या पेटल्या...थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे शहरात देखील ग्रामीण भागाप्रमाणेच नागरिक थंडीचा बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवत आहेत. घरांमध्ये अनेकजण विस्तव ठेवून थंडीपासून संरक्षणाचे उपाय करत आहेत. तसेच अनेकजण दिवसादेखील अंगात गरम कपडे परिधान क रूनच ठेवत आहे. थंडीचा जोर वाढल्याने मॉर्निंग वॉकला येणाºया नागरिकांनी आपल्या वेळेत देखील बदल करून घेतला असून, ऊन पडल्यानंतरच नागरिक बाहेर येत आहेत. चहाच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली असून, सकाळच्या वेळेस चहाच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.