सुवर्ण इतिहासात प्रथमच वर्षभरात सहावेळा सुवर्ण बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:44+5:302021-04-10T04:15:44+5:30
जळगाव : दीडशे वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी बाजार गेल्या वर्षापासूनच कोरोनाचे परिणाम सहन करीत असून ...
जळगाव : दीडशे वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी बाजार गेल्या वर्षापासूनच कोरोनाचे परिणाम सहन करीत असून लॉकडाऊन, निर्बंध, जनता कर्फ्यू, ब्रेक द चेन अशा वेगवेगळ्या नावाखाली सुवर्ण बाजार वर्षभरात सहा वेळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. २२ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या ४०५ दिवसांमध्ये १०१ दिवस सुवर्ण व्यवसाय बंद राहत आहे. ऐन खरेदीच्या हंगामात सुवर्ण बाजार व्यवसाय ठप्प होत असल्याने करोडो रुपयांची उलाढाल थांबून सुवर्ण व्यावसायिक तसेच हस्त कारागिरांवरही परिणाम होत आहे.
कोरोनामुळे गेल्यावर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यात सुवर्णपेढ्यादेखील आल्या. २३ मार्च २०२० पासून हा बंद झाला तरी सुवर्ण बाजारावर त्याच्या एक महिना अगोदर पासून परिणाम जाणवत होते.
कोरोनामुळे मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव सतत गडगडत राहिले. त्यानंतर मुंबईतील दुकाने बंद झाल्याने आयातच नसल्याने सोन्याचे भाव वाढू लागले. असे परिणाम होत असताना २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू, २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले. नंतर हे लॉकडाऊन वाढत जाऊन ४ मे २०२० पर्यंत सुवर्ण पेढ्या बंदच राहिल्या. ५ मे २०२० रोजी सुवर्ण बाजार सुरू झाला, मात्र जळगावात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सुवर्ण व्यवसायिकांनी स्वतः पुढाकार घेत ८ मे २०२० पासून पुन्हा सुवर्ण बाजार बंद ठेवला. त्यानंतर थेट ४ जूनला दुकाने सुरू झाली. महिनाभर सुवर्ण बाजार सुरू राहत नाही तोच पुन्हा जिल्हा प्रशासनाच्यावतीने ७ ते १३ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. १४ जुलैला सुवर्ण बाजार सुरू झाला व त्यानंतर बाजारपेठेत मोठा उत्साह दिसून आला. सणासुदीच्या दिवसातदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन सुवर्ण बाजाराला आधार मिळाला. मात्र नवीन वर्षात मार्च महिन्यापासून पुन्हा सुवर्ण बाजाराला झळा सोसाव्या लागत आहे. यात १२ मार्च ते १४ मार्च दरम्यान जळगावात तीन दिवस जनता कर्फ्यू, २८ मार्च ३० मार्च दरम्यान कडक निर्बंध आणि त्यानंतर आता ६ एप्रिलपासून ब्रेक द चेन जाहीर झाल्याने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद राहणार आहे.
प्रथमच इतके दिवस बंद
जळगावातील सुवर्ण बाजाराला दीडशे वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. येथील सोन्याला देशभरात पसंती असल्याने येथे नेहमी सोने खरेदीसाठी गर्दी असते. या दीडशे वर्षांच्या काळात विविध मागण्यांसाठी कधी चार ते पाच दिवस सुवर्ण बाजार बंद राहिला तर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीमुळे चार दिवस सुवर्ण बाजार बंद होता. त्यानंतर आता प्रथमच एका वर्षात सहावेळा सुवर्ण बाजार बंद राहत आहे.
कोट्यवधींचा फटका
वर्षभरातील सहा वेळा बंद राहण्याचा विचार केला असता सुवर्ण बाजाराला चार ते पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जळगावात वर्षभरासह लग्नसराईच्या हंगामात मोठी खरेदी होते, मात्र गेल्या वर्षी व यावर्षी देखील ऐन लग्नसराईच्या काळातच सुवर्ण बाजार बंद राहिल्याने करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहे. त्याचा व्यावसायिकांना फटका बसत तर आहे सोबतच तेथे काम करणाऱ्या मजूर, कारागिरांनाही त्याची झळ सहन करावी लागत आहे.
वर्षभरातील बंद
२२ मार्च ते ४ मे २०२० - लॉकडाऊन - ४३ दिवस
८ मे ४ जून - स्वयंस्फूर्तीने बंद -२८ दिवस
- ७ जुलै ते १३ जुलै - लॉकडाऊन - ७ दिवस
१२ ते १४ मार्च २०२१ - जनता कर्फ्यू - ३ दिवस
२८ ते ३० मार्च २१ - कडक निर्बंध - ३ दिवस
६ ते ३० एप्रिल २१ - ब्रेक के चेन - २५ दिवस
जळगावातील सुवर्ण बाजाराच्या इतिहासात प्रथमच एवढ्या दिवस सुवर्ण बाजार बंद राहत आहे. यामुळे विवाहासाठीची अनेकांची सोने-चांदी खरेदी लांबणीवर पडली आहे. शिवाय सुवर्णनगरीचा करोडो रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे.
- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन