दीडशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच दोन महिने सुवर्ण बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:16 AM2021-03-23T04:16:57+5:302021-03-23T04:16:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दीडशे वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी बाजाराने कोरोनाचे परिणाम सहन करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दीडशे वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी बाजाराने कोरोनाचे परिणाम सहन करीत लॉक डाऊनमुळे प्रथमच दोन महिने बाजारबंद राहिला. यामुळे विवाह सोहळ्याची खरेदीही लांबणीवर पडली तसेच आर्थिक घडी विस्कटली. यासोबतच जळगावातील डाळ, कापडा, वाहन बाजारही ठप्प झाला होता.
कोरोनामुळे मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव सतत गडगडत राहिले. त्यानंतर मुंबईतील दुकाने बंद झाल्याने आयातच नसल्याने सोन्याचे भाव वाढू लागले. असे परिणाम होत असताना २२ रोजी जनता कर्फ्यू, २३ रोजी लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे सुवर्ण पेढ्या २१ मार्च नंतर उघडलाच नाही. त्यात लॉकडाऊन वाढतच गेल्याने थेट मे महिन्यापर्यंत सुवर्ण बाजार बंद राहिला.
प्रथमच एवढ्या दिवस बंद
येथील सोन्याला देशभरात पसंती असल्याने येथे नेहमी सोने खरेदीसाठी गर्दी असते. या दीडशे वर्षांच्या काळात विविध मागण्यांसाठी कधी चार ते पाच दिवस सुवर्ण बाजार बंद राहिला तर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीमुळे चार दिवस सुवर्ण बाजार बंद होता. त्यानंतर आता प्रथमच दोन महिने सुवर्ण बाजार बंद राहिला.
लग्नाची खरेदी लांबणीवर
या काळात सुवर्ण बाजाराला जवळपास चार हजार कोटी रुपयांचा फटका बसला. यात सुवर्ण बाजारात काम करणाऱ्या कारागिरांच्या हातचे काम गेल्याने त्यांच्यावर बेरोजगारी ओढवली. यात बंगाली कारागीर व इतरही कारागीर गावी निघून गेले. ते पुन्हा परत येईपर्यंत साधारण दिवाळीच्या काळ उजाडला. तोपर्यंत अलंकारांची घडणावळही रखडल्याने व्यवसायावर अधिकच परिणाम होत गेला.
५ मे रोजी लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सुवर्ण बाजार सुरू झाला. मात्र शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता ८ मेपासून सुवर्ण व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पुन्हा व्यवहार बंद ठेवले. त्यानंतर आठवडाभराने बाजार सुरू झाला.
डाळ उत्पादनात ७५ टक्क्यांनी घट
जळगावातील दाल उद्योगही मोठा असून येथून देशाच्या विविध भागासह विविध देशात डाळीची निर्यात होत असते. मात्र कोरोनाचा या उद्योगावरही मोठा परिणाम झाला. कृषी मालाची निगडित असलेला हा उद्योग अत्यावश्यक सेवा म्हणून लाॅकडाऊन काळात सुरू होता, मात्र निर्यात नसल्याने त्याचा मोठा फटका उद्योगाला बसला त्यामुळे डाळीच्या उत्पादनात तब्बल ७५ टक्क्यांनी घट आली.
वाहनाची चाके थांबली
जळगावात दुचाकी, चारचाकी या वाहनांची विविध मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मात्र लाॅकडाऊनच्या काळात गुढीपाडवा, अक्षयतृतीया असे मुहूर्त हुकल्याने वाहन खरेदी ठप्प झाली होती. याचा परिणाम वाहन बाजारावर मोठ्या प्रमाणात झाला. मात्र बाजारपेठ सुरू झाल्यानंतर विजयादशमी, धनत्रयोदशी यासह इतर वेळीही वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
साडेचार महिने कापड व्यवसायाने सोसल्या मंदीच्या झळा
कापड व्यवसायालाही मोठा फटका बसला. या काळात लग्नसराई असली तरी दुकाने बंद असल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यात मे महिन्यात लाॅकडॉऊनला शिथिलता दिली गेली, खरी मात्र शहरातील व्यापारी संकुले सुरू न झाल्याने कापड व्यवसायदेखील बंद होता. त्यानंतर ५ ऑगस्टपासून व्यापारी संकुल सुरू झाले व कापड व्यवसायाला पुन्हा गती येऊ लागली. सणासुदीच्या काळात काहीसी भर निघाली. मात्र साडेचार महिने या व्यवसायाने आर्थिक झळा सोसल्या.