रात्रीची शिकार करणार्या फोस्टर्न मांजऱ्या सापाची खान्देशात प्रथमच नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:21+5:302021-01-22T04:15:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चोपडा शहरातील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयात फोस्टर्न मांजऱ्या जातीचा सर्प आढळून आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चोपडा शहरातील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयात फोस्टर्न मांजऱ्या जातीचा सर्प आढळून आला आहे. वन अधिकारी व सर्प मित्रांच्या मते हा सर्प अतिशय दुर्मीळ असून, खान्देशात पहिल्यांदाच आढळून आल्याचा दावा वन अधिकाऱ्यांनी केला आहे. सर्प मित्र संदीप मालचे, सागर मालचे व सागर बडगुजर यांना हा साप आढळून आला आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समाजकार्य महाविद्यालयात हा साप आढळून आला. प्राचार्य डॉ.ईश्वर एम सैंदाणकर यांनी याबाबतची माहिती सर्पमित्र संदीप मालचे यांना दिल्यानंतर या सापाला सुरक्षितरीत्या पकडले. सापाच्या अंगावरील नक्षीवरुन हा साप फोस्टर्न मांजऱ्या असल्याचे समजले. याबाबतची पडताळणी केली असता अन्य सर्पमित्रांनी हा साप फोस्टर्न मांजऱ्या जातीचा असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. हा साप पकडल्यानंतर चोपडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आला.
सापाचे काय आहे वैशिष्ट
जळगाव जिल्ह्यासह संपुर्ण खान्देशात हा साप कधीही आढळून आलेला नाही. जिल्ह्यात कॉमन कॅट (साधा मांजऱ्या) आढळतो. मात्र, फोस्टर्न मांजऱ्याची नोंद आतापर्यंत झाली नव्हती. हा साप ३ ते ४ फुट इतका लांबीचा असतो. अंगावर तपकीरी किंवा राखाडी रंगाच्या एकाआड एक चौकाेनांची नक्षी किंवा आडवे पट्टे असतात. तसेच डोक्यावर एक गडद काळी तसेच डोळ्यांमागे मानेपर्यंत एक काळी रेष असते. रुंद त्रिकोणी डोक्यापासून मान वेगळी दिसते मोठ्या डोळ्यात उभी बाहुली असते. हा साप निमविषारी असून, हा निशाचार आहे. रात्रीच्या अंधारातच हा साप शिकार करत असतो. याचे एक वैशिष्ट म्हणजे हल्ला करतात हा साप नेहमी फुत्कार करत असतो. तसेच झाडावर देखील उत्तमप्रकारे चढत असतो. हा साप पश्चिम घाटात नेहमी आढळून येतो.
कोट..
फोस्टर्न मांजऱ्या साप आपल्या खान्देशात मिळणे वन्यजीव अभ्यासक व वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. खान्देशात अनेक दुर्मीळ प्राणी व पक्षी आढळून येतात. खान्देशातील जैवविविधता संपन्न असून, याची जतन करण्याची गरज आहे.
-संदीप मालचे, सर्पमित्र, चोपडा