राज्यात पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:27 PM2020-07-07T17:27:34+5:302020-07-07T17:33:24+5:30
भुसावळ , जि.जळगाव : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम ...
भुसावळ, जि.जळगाव : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती येथील मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ.जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित उपक्रमांतर्गत दहावी-बारावी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर आले.
आपल्या पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींना पाहण्याचे व ऐकण्याचे आकर्षण प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये असते. हेच आकर्षण पूर्ण करण्यासाठी डॉ.जगदीश पाटील यांनी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद असा उपक्रम राबवला. याअंतर्गत प्रारंभी दहावी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. डॉ.सुनील विभुते (निर्णय), डॉ.महेंद्र कदम (आजी : कुटुंबाचं आगळ), ज.वि. पवार (तू झालास मूक समाजाचा नायक), वीरा राठोड (मनक्या पेरेन लागा), डॉ.नीलिमा गुंडी (बोलतो मराठी...), डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे (कर्ते सुधारक कर्वे), आसावरी काकडे (खोद आणखी थोडेसे), डॉ.विजया वाड (बालसाहित्यिका : गिरिजा कीर), अरविंद जगताप (आप्पांचे पत्र), नीरजा (आश्वासक चित्र), द.भा. धामणस्कर (वस्तू), सुप्रिया खोत (गोष्ट अरूणिमाची) अशा बारा लेखक-कवींसह डॉ. दिपाली पूर्णपात्रे (सोनाली पाठातील पात्र), हभप चारूदत्त आफळे महाराज (संत रामदास यांच्या उत्तम लक्षण काव्यावर निरूपण) आणि बालभारतीच्या मराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांनी समारोपीय संवाद साधला.
अशा पद्धतीने दहावीची पंधरा ऑनलाईन संवाद सत्र पार पडली.
याच धर्तीवर बारावी मराठी युवकभारती पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला.
हिरा बनसोडे (आरशातली स्त्री), डॉ. प्रतिमा इंगोले (गढी), कल्पना दुधाळ (रोज मातीत), अनुराधा प्रभुदेसाई (वीरांना सलामी) अशा चार लेखक-कवींनी शिक्षकांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरणाची वाटचाल यासंदर्भात शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधून सत्राचा समारोप केला. अशा पद्धतीने बारावीची पाच ऑनलाईन संवाद सत्र पार पडली. राज्यात पहिल्यांदाच दहावी-बारावी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद या उपक्रमांतर्गत वीस संवाद सत्रे पार पडून पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.पाटील यांनी साधली. या उपक्रमाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ऑनलाईन संवाद सत्रात सहभागी झालेल्या लेखक-कवींच्या सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग युट्युबवर अपलोड करून सर्वांसाठी खुले करून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.