यंदा प्रथमच नाटकांना उत्तम रसिकाश्रय - नाट्य समिक्षकांच्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:21 PM2018-12-15T12:21:09+5:302018-12-15T12:21:31+5:30

मध्यप्रदेशातील नाटकांकडून खूप शिकण्यासारखे

For the first time this year, the theater of the great theater - dramatical writers | यंदा प्रथमच नाटकांना उत्तम रसिकाश्रय - नाट्य समिक्षकांच्या भावना

यंदा प्रथमच नाटकांना उत्तम रसिकाश्रय - नाट्य समिक्षकांच्या भावना

Next

जळगाव : जळगाव केंद्रावर यावर्षी सादर झालेल्या नाटकांची संख्या अधिक होती व यंदा प्रथमच उत्तम रसिकाश्रयही लाभला. यंदा मध्यप्रदेशातून सहा नाटके आली होती. त्यांचे सादरीकरण निश्चित कौतुकास्पद होते, अशा भावना नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेतील समिक्षकांनी ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केल्या.
महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक संचलनालयातर्फे नुकत्याच राज्य नाट्य स्पर्धा झाल्या. यावेळी समन्वयिका सरिता खाचणे, वैशाली पाटील, प्रा. राजेंद्र देशमुख, योगेश शुक्ल, सचिन चौघुले व हेमंत काळुंखे आदी यावेळी उपस्थित होते. त्यांचे स्वागत निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
नाट्यगृहाचे भाडे अवास्तव
सादर झालेली नाटके ही शासनाने उभारलेल्या नाट्यगृहात झाली असती तर ते अधिक चांगले झाले असते. हे नाट्यगृह रंगकर्मींसाठीच आहे, हे विसरून चालणार नाही. विशेष म्हणजे सरावासाठी हॉलही या ठिकाणी आहे मात्र त्याचेही भाडे परवडण्यासारखे नाही. वीज बिलासाठीच दिवसाला ७५० रूपये खर्च सांगितला जातो. नाशिकच्या कालिदास हॉलमधील सरावाचे दालन २५०० रूपयात महिन्यासाठी उपलब्ध होते. मात्र जळगावात अव्वाचे सव्वा भाडे सांगितले जाते. वास्तविक स्पर्धा ही शासनाचीच तरीही ही परिस्थिती. आगामी काळात बालनाट्य स्पर्धा आहेत. त्यांच्यासाठी तरी हे नाट्यगृह उपलब्ध करून दिले जावे अशा अपेक्षा नाट्य समिकक्षांनी यावेळी व्यक्त केल्या.
वेळेचे अचूक नियोजन
यंदा सर्वार्थाने उत्तम असे सादरीकरण दिसून आले. विशेष म्हणजे नाटकांना रसिकाश्रयही उत्तम मिळाला. चाकोरीबाहेरील विषय नाट्य मंडळांनी घेऊन सादरीकरण केले. यंदा प्रथमच राष्टÑगीत म्हणण्याची प्रथा सुरू झाली. जुन्या, नव्या संहिता होत्या. नाटकांमध्ये नवीन विषय आले पाहीजेत. सहभागी नवीन मुलांनी चांगला अभिनय केला.
- राजेंद्र देशमुख
सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी
समन्वयिका म्हणून या क्षेत्रात संधी मिळाली त्यावेळी अनेकांनी शंका उपस्थित केल्या. मात्र स्थानिक व बाहेरून आलेल्या रंगकर्मींनी केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अतिशय यशस्वी होण्यात मदत मिळाली. यानंतर लागलेल्या निकालानंतर सर्वच खूश आहेत. नाटकांना येतांना अनेक जण तिकीट घेवून येत होते. आवाहनानंतर काही जण नाटक संपल्यानंतर तिकीट सुद्धा घेत होते. रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यंदा गेल्या अनेक वर्षानंतर मध्यप्रदेशातील नाटकेही सहभागी झाली. -सरिता खाचणे
यंदा नाटकांची संख्या वाढली
अनेक वर्षानंतर जळगावात २१ नाटके सादर झाली. २३ प्रवेशिका होत्या. मध्यप्रदेशातून इंदूर येथून ५ व देवासहून एक नाटक येथे सादर झाले. गेल्या वर्षी नाटकांची संख्या १४ होती. नाटके सादर करताना काही तांत्रिक अडचणी आल्या पण समन्वयातून त्या सोडविण्यात यश आले. सेन्सॉरचे प्रमाणपत्र काही मंडळांकडे नव्हते. ते मिळवून त्यांचे नाटक सादर करण्यास मदत झाली. एक टीमवर्क यावेळी दिसून आले. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
- योगेश शुक्ल
इंदूरपासून शिकण्यासारखे
यंदाचे सादरीकरण दणदणीत झाले. १० वर्षांनंतर इंदूरचा सहभाग विशेष असाच होता. अंतिम स्पर्धेसाठी दोन नाटके जावीत यासाठी पुरेशी संख्या यावेळी होती. आधुनिक असे तंत्रज्ञान यावेळी वापरले गेले. अध्यात्मीक, तंत्रज्ञान, सैनिकी विषयावरील यासारखी नाटके सादर झाली आणि त्यांना दादही उत्स्फूर्त मिळाली. सादर झालेल्या नाटकांमधून खूप काही शिकण्यासारखे होते. मध्यप्रदेशातून आलेल्या नाटकांचे सादरीकण उत्कृष्ट होते. बक्षीसे देतांना याचा विचार होणे अपेक्षित होते.
-वैशाली पाटील
स्पर्धा चांगली झाली
स्पर्धा खरोखर अतिशय चांगली झाली. स्पर्धेसाठी इंदूरची मंडळी तयारीने आली होती. त्यामुळे जळगाव व इंदूर अशी तुलना होऊ नये असे वाटते. नाटके सादर करताना जुनी व नवी संहिता यात निश्चित फरक आहे. त्यामुळे निर्णय देताना जे निकष लावले गेले ते निश्चितच चांगले म्हणावे लागतील. नाटके सादर होताना रसिकांना तिकीटांबाबत आवाहन केले जात होते. काही जणांनी नाटक पूर्ण झाल्यानंतर बाहेर जाऊन तिकीटे घेतली हे यंदा प्रथमच जाणवले व ती अतिशय चांगली बाब आहे.
-सचिन चौघुले
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नाटकांमध्ये यंदा प्रथमच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे लक्षात आले. समिक्षण हे रसिकांच्या दृष्टीकोणातून व्हायला हवे. जळगावचे केंद्र एकेकाळी बंद झाले होते. मात्र प्रोत्साहन मिळत गेल्याने उत्साह वाढत असल्याचे लक्षात येते आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी नाट्यचळवळीस प्रोत्साहन मिळेल अशी कामे करावीत.
- हेमंत काळुंखे

Web Title: For the first time this year, the theater of the great theater - dramatical writers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव