जळगाव जिल्ह्यातील पहिली उचंदा ग्रामपंचायत झाली पेपरलेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:37 AM2018-09-12T00:37:41+5:302018-09-12T00:39:09+5:30
सर्व नोंदी व दाखले मिळणार आॅनलाइन
उचंदा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे गावाने जळगाव जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा बहुमान पटकाविला आहे. यापुढे सर्व नोंदी व दाखले ग्रामस्थांना आॅनलाईन पारदर्शक व स्वच्छ होणार आहे.
ग्रामस्थांना जलद व गतिमान सेवा मिळणार असल्याने लोकांना वेळ व श्रम वाचणार असल्याची माहिती ग्रामसेवक एकनाथ कोळी यांनी दिली. ग्रा.पं.पेपरलेस होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), बी.ए.बोटे, बीडीओ डी.आर.लोखंडे, आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा समन्वयक किशोर धोटे, तालुका समन्वयक नरेंद्र ठाकरे, विस्तार अधिकारी बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा.पं.संगणक परिचालक योगेश पाटील, ग्रामसेवक एकनाथ कोळी, साहेबराव पाटील व सरपंच शशिकला पाटील यांच्या सहकार्याने सर्व दप्तर आॅनलाईन केले आहे.
उचंदा ग्रा.पं. जिल्ह्यात पहिली पेपरलेस ग्रा.पं.झाली आहे. ग्रामस्थांना एक ते ३३ प्रकारचे विविध नोंद व दाखले हे आता आॅनलाईन मिळणार आहे. त्यामध्ये रहिवासी, जन्म-मृत्यू व ८ अ असे विविध दाखल्यांचा समावेश आहे. यासाठी प्रत्येक संगणकीकृत दाखल्यांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाईल. दोन मिनिटात ग्रामस्थांना दाखला मिळेल. हे शुल्क ग्रा.पं.फंडात जमा करणार असल्याचे ग्रामसेवक एकनाथ कोळी यांनी सांगितले.
उचंदे गावाला आतापर्यंत कोणताच बहुमान मिळाला नव्हता. नेहमी विकास कामात पीछाडीवर असणाऱ्या उचंदा ग्रा.पं.ला पेपरलेस होण्याचा जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाल्याने गावाची शान वाढली आहे. उचंदे गावासाठी हा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. उचंदा गावाला पेपरलेस होण्याचा मान मिळाल्याबद्दल पं.स.सभापती शुभांगी भोलाणे, बीडीओ डी.आर.लोखंडे, सर्व पं.स.सदस्य, सरपंच शशिकला पाटील व सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.