जळगावात अधिष्ठातांनी घेतली कोविशिल्डची पहिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:10+5:302021-01-17T04:14:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बहुप्रतीक्षित आणि सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला अखेर शनिवारी जळगावात प्रारंभ झाला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बहुप्रतीक्षित आणि सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला अखेर शनिवारी जळगावात प्रारंभ झाला. सकाळी ११.१५ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पहिली लस घेऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी लस घेतली. जिल्ह्यातील सात केंद्रांवर पहिल्या दिवशी ७०० लाभार्थींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महापालिकेचे डी. बी. जैन रुग्णालय, चोपडा, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयातही लसीकरण माेहीम राबविली जात आहे. डी.बी. जैन रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना पहिली लस देण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या ७ जणांना पहिल्या अर्धा तासात कुठलाही त्रास जाणवला नाही. यानंतर ते नियमित कामांवर रुजू झाले.
असे झाले लसीकरण
सुरुवातीला नोंदणी कक्षात स्क्रीनिंग करून ओळखपत्र तपासून लाभार्थीला प्रतीक्षालयात बसविण्यात आले. तेथून लसीकरण रूममध्ये पाठवून आधी ॲपवर कागदपत्रांची तपासणी झाली, नंतर लस देऊन निरीक्षण कक्षात अर्धा तास बसविण्यात आले. काहीही त्रास नसल्याने सोडण्यात आले.
यांच्यापासून सुरुवात
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, मेट्रन कविता नेतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, शरीररचना शास्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण कासोटे, अधिसेविका जयश्री जोगी, फिजिओथेरेपी विभागाचे अमित वाघडे अशा क्रमाने या लसीकरणाला सुरुवात झाली.
सीएस, डीएचओ थांबलेच नाही
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाला लस घेतली. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील निघाल्यानंतर डॉ. चव्हाण व डॉ. जमादार हे प्रतीक्षालयात अर्धा तास न थांबता गेले व तेथून त्यांनी डी. बी. जैन रुग्णालयात भेट दिली. अन्य अनेक कर्मचारीही प्रतीक्षालयात थांबले नाही, चालेल का, अशी विचारणा करीत होते.