परमेश्वराच्या मत्स्यावताराशी तादात्म्य पावलेला कोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 04:06 PM2019-08-28T16:06:54+5:302019-08-28T16:07:16+5:30
शाळेत शिकविलेले बारा बलुतेदार, बारा अलुतेदार आणि त्यांचे समाजातील महत्त्व याविषयी स्वानुभवासह ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लेखमालेच्या स्वरूपात लिहिणार आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठातील प्रसिद्ध वकील माधव भोकरीकर. ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याचे. बारा बलुतेदार या लेखमालेतील पहिला भाग.
आमची शेती तापी नदीच्या काठी. खाली वाकले, की ‘सूर्यकन्या तापी’ दृष्टीस पडते. पूर्वी वर्षभर वाहती असायची. आता जरा थबकलीय. पावसाळ्यात वाहते. एरवी आमच्याकडे, तिच्या लेकरांकडे बघते. शेती-गावाला जायचे तर त्यावेळी बस नसायची. बैलगाडीने जायला लागायचे. बैलगाडी नव्हती. तेव्हा पायी जायचे. बराच वेळ लागायचा. इलाज नसायचा. पावसाळ्यात कमालीचा त्रास. एकदा उन्हाळ्यात वडिलांबरोबर शेताच्या गावी मुक्कामाला होतो. उन्हाळ्यात पण पहाटे-पहाटे अंगावर गोधडी घ्यावीच लागायची, एवढा गारवा असायचा.
‘चलतो का अंतुर्लीला? नदीपार आहे. डोंग्यातून जावू. वडिलांनी विचारले. मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. नदीतून डोंग्याने म्हणजे छोट्या होडीने, नदीपार जाण्याचा तो आयुष्यातला पहिला प्रसंग!
प्रत्यक्ष नदीपार करणे असो, का आयुष्याचा भवसागर पार करणे असो, तो पार पाडण्याच्या कामात, आजपावेतो सहकार्य करत आलेला आहे, तो आपला 'कोळी' समाज. प्रवाशाला नदीपार करून, तेथील प्रवासी अलीकडील किनारी आणणारा, नाही मिळाले तरी पुन्हा दुसऱ्या प्रवाशांसाठी अलीकडील तीरावर न कंटाळता येणारा हा 'कोळी समाज' आपल्या समाजाचा महत्त्वाचा घटक आहे.
आपल्या आयुष्याच्या भवसागराला पार करण्याचे तत्त्वज्ञान, ज्यांनी-ज्यांनी समस्त जगताला दिले, त्यांत 'कोळी समाजाचा' महत्त्वाचा सहभाग आहे. संस्कृत साहित्यातील पहिला श्लोक महर्षी वाल्मिकींना, पारध्याने प्रणयांत मग्न असलेल्या, क्रौंच पक्ष्याच्या नराला मारला, त्या वेळी स्फुरला, तो शापवाणीच्या रूपात.
मां निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा: । यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधी: काममोहितम॥
हे पारध्या, तुला अनंत काळापर्यंत शांती मिळणार नाही, कारण प्रणय क्रीडेत रमलेल्या, सावध नसलेल्या क्रौंच पक्षातील एकाची हत्या केली आहे.
हा अचानक स्फुरलेला श्लोक महर्षी वाल्मिकींना चकित करून गेला. विचार करत ते आश्रमात आले. त्यांना ब्रह्मदेवाने दर्शन दिले आणि आठवण करून दिली, ती देवर्षी नारदाने सांगितलेल्या रामकथेची! मग त्यांच्या असाधारण बुद्धीतून जन्म झाला, तो 'रामायण' या महाकाव्याचा. आपल्या संस्कृतीचे मौल्यवान साहित्य-रत्न.
अजून एक घटना आठवते धीवर-कन्या सत्यवतीची. महर्षी पाराशर आणि सत्यवतीचा, अलौकिक प्रतिभेचा सप्त-चिरंजीवांपैकी, हा पुत्र. महर्षि कृष्णद्वैपायन वेदव्यास, समस्त जगताचे गुरू. यांच्या जन्मदिनी, आषाढी पौर्णिमेला आपण 'व्यास पौर्णिमा' म्हणजे 'गुरूपौर्णिमा' साजरी करतो. 'व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम' म्हणजे 'या भूतलावर असा कोणताही विषय नाही, की त्या विषयाला महर्षी व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला नाही' असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते, ते महर्षी व्यास. यांनी समस्त जगताला अलौकिक साहित्य दिले. महाभारत, अठरा पुराणे, विविध उपनिषदे लिहिलीत. वेदांच्या संपादनाचे कार्य केले. त्यांच्या या हिमालयापेक्षा भव्य अशा साहित्य-कार्यातील एक असलेले हे ‘महाभारत.’ जे प्रत्यक्ष भगवान गणेशाने त्यांचे लेखनिक होऊन लिहिले.
आपल्या समस्त संस्कृतीचा, त्यातील निर्माण झालेल्या साहित्याचा विचार केला, तर 'रामायण, महाभारत' हे आपल्या जीवनाचे अभिन्न अंग आहे. आपल्या देशात आजपण असंख्य जण निरक्षर आढळतील, पण त्यांना 'रामायण' 'महाभारत' माहीत नाही असे होणार नाही. इतके 'रामायण आणि महाभारत' आमच्यात रुजलेले आहे. आमच्या समाजाला, त्याच्या आचार-विचाराला एक वळण दिले आहे. त्यांनी दिलेली ही अलौकिक देणगी, तिचे महत्त्व आपल्याला अजिबात नाकारता येणार नाही. समाजासाठी, आपल्या चिरंतन संस्कृतीसाठी ज्या विविध ज्ञानी व्यक्तींनी आपले योगदान दिले, त्यात असलेले हे 'कोळी समाजाचे' योगदान कसे नाकारता येईल? माझ्या शालेय वयात शाळेत शिकविलेले 'बारा बलुतेदार, बारा अलुतेदार आणि त्यांचे समाजातील महत्त्व' हे त्यावेळी फक्त अभ्यासापुरते लक्षात होते. आता त्यांचे महत्त्व जाणवतेय, लक्षात येतेय. बारा बलुतेदारांमधील मानली गेलेली 'कोळी' ही एक जात. नारळी पौर्णिमा ते होळी पर्णिमेपर्यंत, यांचे मासेमारीचे काम चालते. पावसाळ्यात पकडलेली मासळी उन्हाळ्यात वाळवून, पुढच्या पावसाळ्याची वाट बघितली जाते. 'नारळी पौर्णिमेचा' मोठा उत्सव त्यांच्यात साजरी केला जातो.
-माधव भोकरीकर, जळगाव