अमळनेर येथील तलाठ्यावर हल्ला प्रकरणात पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:23 PM2018-02-05T23:23:19+5:302018-02-05T23:25:46+5:30
अमळनेर तालुक्यातील आंचलवाडी ते रणाईचे रस्त्यावर तलाठी योगेश रमेश पाटील यांच्यावर हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात शीतल सुखदेव देशमुख, योगीराज डिगंबर चव्हाण, उमेश उत्तम वाल्हे, श्रीकांत उर्फ प्रदीप विठ्ठल पाटील व शिरीष पाटील (सर्व रा.अमळनेर) या पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी अमळनेर न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,५: अमळनेर तालुक्यातील आंचलवाडी ते रणाईचे रस्त्यावर तलाठी योगेश रमेश पाटील यांच्यावर हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात शीतल सुखदेव देशमुख, योगीराज डिगंबर चव्हाण, उमेश उत्तम वाल्हे, श्रीकांत उर्फ प्रदीप विठ्ठल पाटील व शिरीष पाटील (सर्व रा.अमळनेर) या पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी अमळनेर न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल विभागाच्या पथकातील तलाठी योगेश पाटील यांच्यावर १७ जानेवारी रोजी रात्री ९ जणांना हल्ला करुन बेदम मारहाण केली होती. या हल्लेखोरांच्या तावडीतून जीव वाचवत पळत सुटलेल्या पाटील यांना प्रांताधिका-यांनीच रस्त्यावर मदत केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने जिल्हाभरातील तलाठ्यांनी काम बंद आंदोलन छेडले. स्वत: जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने काही आरोपींना अटक झाली, मात्र मुख्य आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. अशा स्थितीत त्यांनी अमळनेर न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सोमवारी कामकाज होऊन हा अर्ज फेटाळण्यात आला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी स्वत: सरकार पक्षाची बाजू मांडून जामीनास विरोध दर्शविला.