रावेर दंगलीतील पाच आरोपी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 04:51 PM2020-09-20T16:51:55+5:302020-09-20T16:53:17+5:30
पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.
किरण चौधरी
रावेर : दंगल घडविणे, दंग्यात भाग घेणे यासह इतर आरोपांवरून रावेर शहरातील चार व बक्षीपूर येथील एक अशा पाच आरोपींना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेऊन एमपीडीए कायद्यान्वये नाशिक कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.
पोलीस सूत्रांनुसार,, कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी २२ मार्च रोजी पंतप्रधानांनी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूच्या दिवशी मण्यार वाड्यातील प्रार्थना स्थळासमोरील रस्त्यावर जमावबंदीचा आदेश झुगारून गर्दी का केल्याचे हटकल्यावरून मण्यारवाडा, शिवाजी चौक, बारीवाडा ते थेट कोणताही सुतराम संबंध नसलेल्या संभाजीनगरात जातीय दंगलीचा पेट्रोल बॉम्बच्या साह्याने आगडोंब उसळून सात वाहनाची जाळपोळ, दगडफेक करून शासकीय वाहनांची नासधूस करून व पोलिसांना जायबंदी करून मोठी दंगल उसळली होती. सपोनि शीतलकुमार नाईक, पो.ना. जितू पाटील, पो.ना. महेंद्र सुरवाडे, पो.कॉ.सुरेश मेढे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सपोनि शीतलकुमार नाईक यांनी आपल्या सर्व्हीस रिव्हॉल्व्हरमधून हवेत तीन राऊंड फायर करून जमाव पांगवत दंगलीवर नियंत्रण मिळवले होते. या दंगलीत एकाची निर्घृण हत्या व दोन जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तथा परस्परविरोधी व सरकार पक्षातर्फे सहा गुन्हे रावेर पोलिसात दाखल करण्यात आले होते.
या दंगलीत १२ दिवस शहरात संचारबंदी लागू करीत तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोरजे तीन दिवस तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी पाच दिवस तळ ठोकून अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकांनी दोन्ही गटातील १५२ आरोपींना अटक केली होती.
दरम्यान, पोलिसांनी कठोर मेहनत घेऊन गत ८ ते १० दंगलीतील गुन्हेगारीचा परामर्श घेऊन नेहमी दंगली घडवणे, दंगलीत सहभागी होणे व दंगली घडवण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप ठेवून आरोपी शेख कालू शेख नुरा (वय ५३, रा.मन्यार मोहल्ला, रावेर), शेख मकबूल शेख मोहियोद्दीन (वय ५७, रा.मदिना कॉलनी, रावेर), आदीलखान उर्फ राजू बशीरखान (वय २२, रा.शंकर प्लॉट, रावेर), मधुकर उर्फ मधू पहेलवान रामभाऊ शिंदे (वय ६२, रा.शिवाजी नगर, रावेर) व स्वप्नील मनोहर पाटील (वय ३४, रा.बक्षीपूर या पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र धोकादायक प्रतिबंधक कायदा १९८१ च्या कलम ३ (१) अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करताच एमपीडीए कायदा कलम ३(१) अन्वये या पाचही आरोपींना रविवारी पुर्व रात्री शून्य प्रहरात ताब्यात घेऊन एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. रावेर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
रावेरकरांनी समाजस्वास्थ्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील कायदा व सुव्यवस्था शांततेला तडा जाईल अशी कोणतीही अनुचित कारवाई करून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याबाबत गंभीर दखल घ्यावी. शहरातील आणखी १२ ते १५ आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता एमपीडीए वा मोका कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासन विचाराधीन असून तत्संबंधी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
-रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक, रावेर पोलीस स्टेशन, रावेर