साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी केलेच नाही बँक खात्याशी आधार लिंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:18+5:302021-03-05T04:16:18+5:30
जळगाव : उच्च शिक्षण विभागाच्या विविध योजनांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील ५ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी अद्यापही ...
जळगाव : उच्च शिक्षण विभागाच्या विविध योजनांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील ५ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी अद्यापही बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यात पडून असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तत्काळ आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागातर्फे विविध १३ शिष्यवृत्ती दिल्या जात असतात. सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या विविध शिष्यवृत्तीसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तिन्ही जिल्ह्यातून जळगाव उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला ८ हजारावर ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले होते. त्यानंतर काही महिन्यातच काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला होता. मात्र, अजूनही ५ हजार ६८२ पात्र विद्यार्थ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे. शिष्यवृत्तीसाठीची रक्कमसुद्धा शासन खात्यावर पडून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तत्काळ आधार क्रमांक लिंक केल्यानंतर त्यांच्या प्रोफाईलवर रिडीम करून रिड करणे आवश्यक आहे.
अन्यथा उशिरा मिळू शकतो शिष्यवृत्तीचा लाभ
यावर्षी ३ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरले आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अर्ज सादर करता येईल. पण, ५ मार्चपर्यंत अर्ज दाखल करणा-या विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्याची शक्यता. उशिरा अर्ज दाखल करणा-यांना शिष्यवृत्तीचा लाभही उशिरा होईल, असेही सूत्रांनी सांगितले. यंदा आलेल्या अर्जांपैकी १,१८१ अर्जांना शासनाने मान्यता दिली असून महाविद्यालयांच्या लॉगिनवर दीड हजार प्रलंबित आहे. तर उच्च शिक्षण विभागाच्या लॉगिनवर ५९ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे.