साडेपाच हजारावर करदात्या शेतकऱ्यांनी भरले साडेपाच कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:43+5:302021-05-30T04:13:43+5:30

स्टार ७५७ जळगाव : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या १३ हजारावर आयकर दाते शेतकऱ्यांपैकी पाच हजार ७०२ ...

Five and a half thousand taxpayer farmers paid five and a half crore rupees | साडेपाच हजारावर करदात्या शेतकऱ्यांनी भरले साडेपाच कोटी रुपये

साडेपाच हजारावर करदात्या शेतकऱ्यांनी भरले साडेपाच कोटी रुपये

Next

स्टार ७५७

जळगाव : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या १३ हजारावर आयकर दाते शेतकऱ्यांपैकी पाच हजार ७०२ जणांनी पाच कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम परत केली आहे. अजून सात हजार ४७० शेतकर्‍यांकडून ही रक्कम येणे बाकी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ देण्यात आलेले १३ हजार १७२ शेतकरी हे आयकर दाते असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ते लाभार्थी या योजनेंतर्गत पुढील हप्ता मिळण्यास अपात्र ठरले व त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांवरील लाभाची रक्कम वसूल करुन केंद्र शासनाला परत करण्यात येणार आहे. यासाठी या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.

या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती शासनाला पाठवताना सरसकट शेतकऱ्यांची नावे शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात आला. जिल्ह्यात या योजनेंतर्गत ४ लाख ९७ हजारावर लाभार्थी शेतकरी दरवर्षी ६ हजार रुपयांचा किसान सन्मान निधी मिळण्यास पात्र आहेत. शासनाने किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आयकर विभागाकडे पाठविली होती. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३ हजार १७२ लाभार्थी हे आयकर दाते असल्याचे आढळून आले होते. त्या लाभार्थ्यांची यादी शासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविली होती.

आतापर्यंत पाच कोटी ४२ लाख ३४ हजार वसूल

आयकरदात्या लाभार्थ्यांकडून किसान सन्मान निधीचे हप्त्याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. जिल्ह्यातील १३ हजार १७२ लाभार्थ्यांकडून १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांचा सन्मान निधी वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयाचे स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे. ती रक्कम योजनेच्या जिल्हास्तरीय खात्यात जमा करुन राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठवण्यात येणार आहे. आयकर दात्या शेतकऱ्यांनी रक्कम भरण्यास सुरुवात केली असून यामध्ये आता पर्यंत पाच हजार ७०२ करदात्या शेतकऱ्यांनी पाच कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी - ४,४७०००

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी - ५७०२

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठवलेले शेतकरी- १३,१७२

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी - ७४७०

काय म्हणतात शेतकरी

पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र याचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नाही. हा लाभ मिळाल्यास मोठा आधार होईल. कोरोनाच्या संकटात शेतीमाल विकणे कठीण होत असल्याने या योजनेचा लाभ मिळाल्यास शेतकऱ्यास दिलासा मिळू शकतो.

- शरद चौधरी, शेतकरी

एकीकडे करदात्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. मात्र जे खरे गरजू शेतकरी आहे ते यापासून वंचित राहत आहे. गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्यास निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.

- शेषराव महाजन, शेतकरी.

वेळ मर्यादा नाही

करदात्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असला तरी त्यांच्याकडून वसूल करण्यात येणाऱ्या रकमेसाठी वेळ मर्यादा ठरवून दिलेली नाही. या शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे, मात्र सर्वजण लगेच ही रक्कम भरत नसल्याने काही जण पुढे येत आहे. हळूहळू ही रक्कम वसुली होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Five and a half thousand taxpayer farmers paid five and a half crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.