केकत निंभोऱ्यात दुरई खाल्ल्याने पाच जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 03:13 PM2019-05-26T15:13:13+5:302019-05-26T15:13:23+5:30
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : ४० जनावरे वाचविण्यात पशुवैद्यकीय अधिकाºयांना यश
पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या केकत निंभोरा येथे शेतातील दुरई खाल्ल्याने २ बैल, २ गायी व १ म्हैस अशी एकूण पाच जनावरे जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना २५ रोजी घडली. सुमारे ४० जनावरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
माहिती अशी केकत निंभोरा येथील गुराखी प्रल्हाद व्यवहारे २५ रोजी नेहमीप्रमाणे गुरे जंगलात चारण्यासाठी घेऊन गेले. चरता चरता जनावरे संजय बाबूलाल पाटील यांच्या गोंडखेल रोडवरील दुरईच्या शेतात घुसली. शेतातील दुरई खाल्ल्याने एका पाठोपाठ एक जनावरे जमिनीवर कोसळल्याने प्रल्हाद व्यवहारे घाबरले. त्यांनी जनावरांचे व शेताचे मालक यांना भ्रमणध्वनीवरून झालेला प्रकार कथन केला. घटनेची माहिती गावात मिळताच पोलीस पाटील गोरखनाथ बहिरे, दशरथ पाटील, कपिल पाटील, श्रीराम पाटील यांच्यासह शेत व जनावरांचे मालक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉ. एकनाथ खोडके यांच्याशी संपर्क साधला. डॉ. खोडके हे पशुसंवर्धन सेवक डॉ. संजय पाटील तत्काळ शेतात आले. जनावरांवर उपचार सुरू केले. शालिक माधव पाटील व बाळू रामदास महाले यांची प्रत्येकी एक गाय, गोविंदा भिकारी पाटील व भारत नामदेव चौधरी यांचा प्रत्येकी एक बैल, रमेश बाबूराव मोरे यांची एक म्हैस अशा पाच जनावरांचा जागीच मृत्यू झाला. दुरई खाल्ल्याने जनावरे मृत्यूचे सत्र सुरूच आहे.