पत्नीच्या खून प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक ; एक महिला फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:09 PM2020-08-06T13:09:03+5:302020-08-06T13:09:17+5:30
दोन दिवसापूर्वीच फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज, पाचही जण पोलिसांना शरण
जळगाव : पत्नीच्या खून प्रकरणात पती पोकॉ.नरेंद्र भगवान सोनवणे याच्यासह सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश व दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) या सर्वांना बुधवारी रामानंद नगर पोलिसांनी अटक केली. नणंद सरला देशमुख (रा.परभणी) या महिलेला अद्याप अटक झालेली नाही. दोन दिवसापूर्वीच सत्र न्यायालयाने चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सर्व पर्याय संपल्याने पाचही जण बुधवारी पोलिसांना शरण आले.
आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाºया सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा १० जुलै रोजी पहाटे जळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात पती पोलीस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द १३ जुलै रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती या गुन्ह्यात २३ जुलै रोजी खून व हुंडाबळीचे कलम वाढविले होते. या प्रकरणात नरेंद्र सोनवणे याला पोलीस अधीक्षकांनी निलंबन केले आहे. तो एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होता.