पाच कोटींचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:09 PM2020-07-10T23:09:51+5:302020-07-10T23:10:28+5:30
पाचोरा तालुका : विविध योजनांचा लाभ
पाचोरा : केंद्र व राज्य सरकार मार्फत राबविण्यात येत असलेल्या निराधार योजनेअंतर्गत पाचोरा तालुक्यात जून अखेर पर्यंत ४ कोटी ९७ लाख ३५ हजार तीनशे रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
तालुक्यात विविध प्रकारच्या योजनेतील एकूण १९ हजार ५०७ लाभार्थी आहेत. यात श्रावण बाळ योजना ८ हजार ४४६, संजय गांधी निराधार योजना ५ हजार ४१, संजय गांधी विधवा निराधार ४८५, संजय गांधी अपंग २६, इंदिरा गांधी निराधार योजना ४हजार ९९८, इंदिरा गांधी विधवा निराधार-४८५, इंदिरा गांधी अपंग निराधार-२६ असे पात्र लाभार्थी आहेत.
या लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात एप्रिल, मे, जून ह्या तीन महिन्याचे पूर्ण अनुदान एकूण ४ कोटी ९७ लाख ३५ हजार ३०० रुपये हे पाचोरा संजय गांधी निराधार योजना कार्यालयामार्फत बँकेत जमा केले आहे.यात केंद्र शासन पुरस्कृत योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ व अपंग योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार सानुग्रह अनुदान व इंदिरा गांधी विधवा पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये सानुग्रह अनुदान जास्तीचे देण्यात आले आहे.
जून अखेर पर्यंत पूर्ण अनुदान निराधारांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे तसेच संगानियो नायब तहसीलदार बी. डी. पाटील यांनी दिली. अव्वल कारकून बी. पी. नेटके, आर. एस. साळुंखे, एस. पी. पाटील यांनी कामकाज पाहिले.
दरम्यान अद्यापही खरे पात्र लाभार्थी योजनांपासून वंचितच असून यापूर्वी बनावट व दिशाभूल करून निराधार म्हणून मंजुरी मिळाल्याने अनेक अपात्र लाभार्थींही पात्र होऊन या योजनांचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र खऱ्या गरजूंना लाभ मिळत नसून त्यांना लाभ मिळऊन द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.