पारोळ्यात दिवसभरात पाच कर्मचाऱ्यांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:19 AM2021-02-09T04:19:12+5:302021-02-09T04:19:12+5:30
जळगाव : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातही आरोग्य व महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांचा अत्यंत थंड प्रतिसाद मिळत असून सोमवारी पारोळा ...
जळगाव : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातही आरोग्य व महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांचा अत्यंत थंड प्रतिसाद मिळत असून सोमवारी पारोळा केंद्रावर दिवसभरात केवळ पाच जणांनी लस घेतली. यानंतर जामनेर केंद्रावरही केवळ १२ कर्मचाऱ्यांनीच लस घेतली. त्यामुळे केंद्र केवळ नावालाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची आता १८ केंद्रे झाली आहेत. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला टप्पाही सुरूच आहे. दुसरा टप्पाही तीन दिवसांपासून सुरू करण्यात आला आहे. येथे दिवसाला २०० जणांनी लस घेणे अपेक्षित आहे. मात्र, कर्मचारीच पुढे येत नसल्याने ही संख्या अत्यंत कमी आहे. जळगावात सुरू झालेल्या तिसऱ्या केंद्रातही केवळ २२ जणांनी लसीकरण करून घेतले. त्यामुळे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
कर्मचारी वाढले मात्र डोस तेवढेच
जिल्ह्यात नोंदणीकृत कर्मचारी वाढले असले तरी प्रत्यक्षात लस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने कोविशिल्डचे ४४ हजार डोस सद्य:स्थितीत पुरेसे असल्याचे चित्र आहे. मात्र, आगामी काळात लसीचे डोस कमी पडणार नाहीत, असा दावा यंत्रणेकडून करण्यात येत आहे.