गर्भवती महिलेची उपचारासाठी पाच तास फिरफिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:03+5:302021-03-20T04:15:03+5:30
जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाची लक्षणे असलेल्या अन्य रुग्णांनाही उपचारासाठी फिरफिर करावी लागत असल्याचे गंभीर ...
जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाची लक्षणे असलेल्या अन्य रुग्णांनाही उपचारासाठी फिरफिर करावी लागत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. साकेगाव येथील एका गर्भवती महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला. भुसावळ येथून जळगावला पाठविल्यानंतर दुपारी चार वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत कोणत्याही खासगी दवाखान्यात त्यांना जागा उपलब्ध झाली नाही, अखेर विनवण्या केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात बेड उपलब्ध करून देण्यात आला होता, त्यानंतर रात्री दोन वाजे सुमारास या महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करून व्हेंटिलेटर लावण्यात आले.
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे चित्र असून रुग्ण दाखल कुठे करावे, हा पेच आरोग्य यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. त्यातच शासकीय यंत्रणेतील बेड फुल्ल असल्याने शिवाय मनुष्यबळाची चिंता असल्याने रुग्णांची फिर होत आहे. साकेगाव येथील एका ६ महिन्याच्या गरोदर असलेल्या महिलेला श्वास घ्यायला त्रास व ताप असल्याने भुसावळ येथे नेल्यानंतर जळगाव येथे हलवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. जळगावला आल्यानंतर नातेवाईकांनी किमान सात ते आठ खासगी रुग्णालये पालथी घातली, मात्र प्रत्येक ठिकाणाहून बेड फुल्ल, व्हेंटिलेटर नाही, अशी उत्तरे मिळाल्याने त्यांना तेथून परतावे लागले. अखेर रात्री नऊ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विनवण्या केल्यानंतर आपत्कालीन विभागाच्या शेजारी असलेल्या कक्षात तात्पुरता स्वरूपात एक बेड देण्यात आला. या ठिकाणी महिलेला ऑक्सिजन लावण्यात आले. मात्र तुम्हाला इथून पेशंटला हलवावे लागेल असे डॉक्टर कर्मचाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शिवाय थेट जिल्हाधिकाऱ्यांशी बोला असा सल्लाही दिला जात होता. रात्री दोन वाजेच्या सुमारास विनवण्या केल्यानंतर संबंधित महिलेला व्हेंटिलेटर लावण्यात आले. अशी माहिती नातेवाईकांनी दिली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत शुक्रवारी बैठकीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याजवळ व्यथा मांडली, सद्यस्थितीत महिलेला व्हेंटिलेटर लावण्यात आले असून उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले. उशिरा उपचार सुरू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
कोट
संबंधित महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिला व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे.
-डॉ. इम्रान पठाण, वैद्यकीय अधीक्षक