जिल्हाभरातील पाचशे आशा सेविका, गटप्रवर्तकांचा जि़.प.ला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 08:36 PM2019-09-13T20:36:09+5:302019-09-13T20:37:49+5:30
रास्ता रोको आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ: डीएचओंनी चौकात येऊन दिले आश्वासन
जळगाव : १८ हजार रूपये वेतनासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील सुमारे पाचशे आशा व गटप्रवर्तकांनी आयटक संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला घेराव म्हणून चौकात रास्ता रोको आंदोलन केले़ तासाभराच्या या आंदोलनात जिल्हा परिषदेत जाणाऱ्यांना रोखण्यात येत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली़ अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पोटोडे व पोलीस प्रशासनाने आंदोलस्थळी मुख्य चौकात येऊन आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़
दुपारी दोन वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना आयटकच्या माध्यमातून कॉ़ अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेकडे येणारी व जिल्हा परिषदेकडून गावात जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प होती़ पुलाचे काम सुरू असलेल्या मुख्य चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ या ठिकाणी आशा सेविकांनी चारही बाजूने मोठे रिंगण करून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली़ यावेळी सुलोचना साबळे, मिनाक्षी सोनवणे, मनिषा पाटील, भारती चौधरी, संगिता सातपुते, आशा मंडळे, कुसूम गोळे, जयश्री सूर्यवंशी, सुनीता ठाकरे, सुरेखा साळुंके जयश्री अत्तरदे, छाया मोरे, वंदना सोनार, शारदा महाजन, प्रतिभा नेरकर, मनिषा सूर्यवंशी आदींसह जिल्हाभरातील आशा सेविका व गट प्रवर्तक उपस्थित होत्या़
तर १८ रोजी जेलभरो
गटप्रवर्तकांना बारा वर्षात मानधनवाढ मिळालेली नाही. वारंवार आश्वासने दिली गेली मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही, आशा सेविका यांना १८ हजार तर गटप्रवर्तकांना २५ हजार मानधन द्यावे, केंद्र सरकारच्या पेंशन योजनेत समाविष्ट करावे, आरोग्य खात्याची वेतन श्रेणी लागू करावी, एकछत्री योजना कार्यान्वीत करावी, रिक्त जागा त्वरित भराव्यात यासह विविध मागण्या करण्यात आल्या़ मागण्या मान्य न झाल्यास १८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़