जिल्ह्यात डेंग्यूचे संशयित पाचशेपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:57 PM2019-11-11T12:57:53+5:302019-11-11T12:58:53+5:30
जळगाव : अवकाळी पाऊस, डासांचा वाढता प्रादूर्भाव यामुळे जिल्ह्यात यंदा डेंग्यू सदृश्य रूग्णांची संख्या पाचशेपर्यंत पोहचली आहे़ मात्र, गेल्या ...
जळगाव : अवकाळी पाऊस, डासांचा वाढता प्रादूर्भाव यामुळे जिल्ह्यात यंदा डेंग्यू सदृश्य रूग्णांची संख्या पाचशेपर्यंत पोहचली आहे़ मात्र, गेल्या आठ दिवसांपासून संशयित रूग्णांमध्ये घट होत असून हिवताप कार्यालयाकडे नियमित वीसच्यावर संशयित रूग्णांचे रक्त नमुने येत होते, ते घटून तीन ते चारवर आल्याचे हिवताप कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे़
जिल्हाभरात यंदा डेंग्यूने थैमान घातले होते़ जिल्हाभरात ११५ रूग्णांना डेंग्य ू असल्याचे निष्पन्नही झाले होते़ दोघांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे आरोग्य विभागानेही स्पष्ट केले होते़ जिल्हा परिषदेच्या समन्वय बैठकीतही हा मुद्दा गाजला होता़ शेतांमधील बांधावर साचणाऱ्या पाण्यात डेंग्यूचे डास आढळत असल्याने यावर काय उपायायोजना करता येतील, असा प्रश्नही पुढे आला होता़ शिवाय जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचेही समोर आले होते़
डेंग्यू निष्पन्न होण्यासाठी होतोय विलंब
जिल्हाभरातील डेंग्यूच्या संशयित रूग्णांच्या रक्ताचे नमूने धुळे, औरंगाबाद येथे पाठविल्यानंतर त्यांचा रिपोर्ट यायला नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवसांचा अधिक कालावधी लागत असल्याने या रूग्णांना नेमका डेंग्यू आहे किंवा नाही, हे स्पष्ट होण्यास वेळ लागत आहे़ मात्र, रूग्ण संशयित असला तरी हिवताप कार्यालयातर्फे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असे सांगण्यात आले आहे़
जिल्हाभरातील संशयित रूग्णांचे नमूने धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय तसेच औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात पाठविण्यात येत असतात़ आधी या नमुन्यांचा अहवाल येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागत होता़ मात्र, आता गेल्या महिना दोन महिन्यांपासून रक्ताचे रिपोर्ट येण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी लागत आहे़ यामुळे नेमक्या किती जणांना डेंग्यूची लागण आहे़ याची स्पष्टता होत नसल्याने रूग्णावर उपचार करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे़ संशयितांच्या रक्तांचे रिपोर्ट लवकर मिळत नसल्याने कदाचित अनेकांचा डेंग्यू शासकीय स्तरावर निष्पन्न झालेला नाही, असेही चित्र आहे़
-जिल्हाभरात ४८९ संशयित रूग्ण आहेत
-डेंग्यू निष्पन्न झालेल्या रूग्णांचा आकडा ११५ कायम आहे़
-यात शहरात ४५ तर जिल्ह्यात ६० रूग्णांना डेंग्यू निष्पन्न झालेला आहे़
-आॅक्टोबरपर्यंत २९१ संशयित होते़ ते दीड महिन्यात झपाट्याने वाढले
-नियमित २० संशयितरूग्णांचे रक्त नमूने हिवताप कार्यालयाकडे येत होते़
-आठ दिवसांपासून ३ ते ४ रूग्णांचे रक्त नमूने तपासणीला येत आहेत़