पाचशे चालक-वाहकांचा रोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:32+5:302021-02-24T04:17:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आठवडाभारापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानांही, महामंडळाची परिवहन सेवा सध्या सुरूच आहे. प्रवाशांकडून मास्क ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आठवडाभारापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानांही, महामंडळाची परिवहन सेवा सध्या सुरूच आहे. प्रवाशांकडून मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नसताना दुसरीकडे आगारातील ५०० चालक वाहकांचा दिवसभरात १५ हजार प्रवाशांसोबत संपर्क येत आहे. त्यात या कर्मचाऱ्यांचे लसीकरणही न झाल्यामुळे कोरोना वाढविण्याची शक्यता अधिकच निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्य परिवहन महामंडळाची सेवा चार महिन्यांपासून पुर्वपदावर आली आहे. दैनंदिन फेऱ्यांची संख्या कमी असली तरी, राज्यासह परराज्यातही वेळापत्रकाप्रमाणे बसेस धावत आहेत. तसेच प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता आठवडाभरापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने, याचा प्रवासी संख्येवरही काहीसा परिणाम झाला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे, महामंडळातर्फे प्रवाशांना वारंवार मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील प्रवाशी ऐकत नसल्यामुळे याचा परिणाम चालक-वाहकांवर होत आहे. दिवसभरात जळगाव आगारातील चालक-वाहक मिळून ५०० जणांचा रोज १५ हजार प्रवाशांशी संपर्क होत आहे. यातील निम्मे प्रवाशी विनामास्क असल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक आहे. तसेच दुसरीकडे चालक-वाहकानांही लसीकरण न देण्यात आल्यामुळे त्यांचाही दिवसभरात हजारो प्रवाशांसोबत संपर्क होत आहे. त्यामुळे चालक-वाहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच बरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामंडळाने जिल्ह्यात सर्व चालक-वाहकांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधुन होत आहे.
इन्फो :
मास्क व सॅनिटायझरचा चालक-वाहकानांच खर्च
- महामंडळातर्फे लॉकडाऊन नंतर ज्यावेळी बससेवा सुरू झाली. फक्त त्यावेळेलाच चालक-वाहकांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले होते.
- आता पर्यंत चालक-वाहकांना महामंडळातर्फे एकदाच मास्क व सॅनिटायझर देण्यात आल्यानंतर, त्यानंतर एकदाही या वस्तू देण्यात आलेल्या नाहीत.
- महामंडळातर्फे साहित्य पुरविण्यात येत नसल्यामुळे चालक-वाहकांना स्व:ताच्या पैशाने मास्क व सॅनिटायझरवर खर्च करावा लागत आहे.
इन्फो :
तपासणी नाहीच
लॉकडाऊन नंतर एसटी महामंडळाची सेवा सुरू झाल्याने, जे चालक-वाहक मुंबई येथे सेवेसाठी गेले होते. त्यांच्याच कोरोना चाचण्या मुंबईहून परतल्यानंतर करण्यात आल्या. मात्र,जळगाव आगारातील चालक-वाहकांची स्वतंत्रपणे कुठलीही तपासणी करण्यात आली नसल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तर आतापर्यंत किती कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले, याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
वाहक -२६१
चालक-२४९
रोजच्या फेऱ्या - ४००
इन्फो :
हजारो प्रवाशांसोबत दररोज सर्वाधिक संपर्क चालक-वाहकांचा येत असतो. त्यामुळे कोरोनाच्या भितीमध्ये काम करावे लागत आहे.तरी महामंडळ प्रशासनाने तात्काळ चालक-वाहकांना लस देणे गरजेचे आहे.
प्रभाकर सोनवणे, चालक
इन्फो :
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आमच्या सुरक्षिततेसाठी महामंडळ प्रशासनाने प्रथम चालक-वाहकांना लस देणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसभरात आमचा हजारो प्रवाशांशी संपर्क येत असतो. अनेक नियमांचे पालन करत नसल्याने, याचा परिणाम आमच्यावर होत आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करणे गरेजेचे आहे.
संदीप सुर्यवंशी, वाहक