जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाचशे रूपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:51 AM2019-05-15T11:51:40+5:302019-05-15T11:52:07+5:30
जमाव बंदीचे केले होते उल्लंघन
जळगाव : अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत असताना जमाव बंदी आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांवर जिल्हापेठ, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याने काढण्यात आलेले वॉरंट रद्द करण्यासाठी आठ जणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड मंगळवारी न्यायालयाने ठोठावला. यात माजी खासदार ईश्वरलाल जैन, अॅड. रवींद्र पाटील, गफ्फार मलीक यांच्यासह अन्य राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सन २०१३, २०१५ आणि २०१६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासनाच्या विविध धोरणांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांविरूध्द जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
खटला पोहोचला न्यायालयात
दाखल गुन्ह्याचा हा खटला न्यायालयात सुरू झाला़ मात्र, गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून न्यायालयीन कामकाजासाठी दिलेल्या तारखांना राष्टÑवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी वारंवार गैरहजर राहिल्यामुळे या आंदोलकांविरुद्ध न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट बजावले होते.
२१ आणि ३० मे रोजी पुढील कामकाज
आता भगत बालाणी, नीलेश सुधाकर पाटील, मनोज दयाराम चौधरी, सलीम इनामदार, गणेश बुधो सोनवणे, इब्राहीम मुसा पटेल, आमदार सतीश पाटील, अयाज अली नियाज अली यांच्या वरील खटल्यात २१ व ३० मे रोजी कामकाज होणार आहे.
सरकारपक्षातर्फे अॅड.निखील कुळकर्णी यांनी तर संशयितांतर्फे अॅड.कुणाल पाटील, अॅड़ अजीम शेख व अॅड़ इम्रान हुसेन यांनी काम पाहिले.
न्यायालयात गर्दी
खटल्यात न्यायालयाने राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वॉरंट बजावल्याने हे नेते दुपारसत्रात न्यायालयात आले होते. त्यामुळे या पक्षाचे अनेक कार्यकर्तेही येथे हजर होते.
त्यामुळे न्यायालय आवारात मोठी गर्दी झाली होती. तर ही नेते मंडळी नेमकी आली कशासाठी याबाबतही चर्चा रंगल्या होत्या.
यांच्या नावे निघाले वॉरंट
न्यायालयीन तारखांना वारंवार गैरहजर राहिल्यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलीक, वाल्मीक विक्रम पाटील, मीर नाजीम अली, मंगला भरत पाटील, परेश दिलीप कोल्हे, विशाल गुलाबराव देवकर हे मंगळवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयात कामकाज होऊन न्यायाधीश ए़एस़ शेख यांनी त्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला़ तर यातील फक्त मीर नाजीम अली यास तीनशे रूपयांचा दंड केला आहे़