एकाच कुटुंबातील पाच बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 01:03 PM2020-05-19T13:03:48+5:302020-05-19T13:03:57+5:30
एकाच दिवसात दहा रुग्ण : मृत तीन जण पॉझिटीव्ह, दोन नव्या भागात रुग्ण
जळगाव : शहरात एकाच दिवशी दहा जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे़ यात आऱ आऱ शाळेजवळील गांधीनगरातील एकाच परिवारातील व बाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचा समावेश आहे़ दुसरीकडे शहरातील तीन मृतांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत़ शहरातील रुग्ण संख्या ६३ वर पोहोचली आहे़
गेल्या तीन दिवसांपूर्वी आऱ आऱ शाळेजवळ रहिवास असलेल्या एका प्रौढाचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते़ त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांचीही तपासणी करण्यात आली़ यात पाच लोकांना कोरोना असल्याचे समोर आले आहे़ यात दोन पुरूष व तीन महिलांचा समावेश आहे़ यासह दक्षता नगरातील एका ३२ वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, शाहू नगरातील एक रुग्ण बाधिताच्या संपर्कातील आहे़
शहरात रोज नव- नवीन भागात रुग्ण आढळून येत असले तरी बाजारात होणारी गर्दी मात्र कायम असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.
१९६ अहवालांची प्रतीक्षा आहे़
जिल्हाभरातून सोमवारी ६५ जणांचे नमुने पाठविण्यात आले असून एकत्रित १९६ अहवालांची प्रतीक्षा आहे़ ४ हजार ७३ जणांची सोमवारी विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे़ दरम्यान, दाखल रूग्णांमध्ये ११ जणांची प्रकृती अत्यवस्थ असून उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे़
नव्या परिसरात शिरकाव
अक्सानगरातील मृत प्रौढ हे बाधिताच्या संपर्कातीलच आहे़ यासह शाहूनगरातील एक महिलाही बाधिताच्या संपर्कातील असून वाघनगरच्या मृत प्रौढांची हिस्ट्री मात्र समोर आलेली नव्हती़ तर दक्षता नगरातील एका पोलिसाचा यात समावेश आहे़ या परिसरातील हा नवीन रुग्ण आहे़ दरम्यान, शाहू नगरातील संपर्कातील ७ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़
तीन जणांचा मृत्यू
अक्सानगरातील ५९ वर्षीय पुरूष, शाहू नगरातील ३४ वर्षीय महिला यांचा रुग्णालयात दाखल असताना मृत्यू झाला तर वाघनगरातील एका ५० वर्षीय प्रौढाला रुग्णाला शनिवारी मृतावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आले होते़ या तिघांचे तपासणी अहवाल रविवारी पॉझिटीव्ह आले आहेत़