चार वेगवेगळ्या अपघातात पाच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 04:36 PM2019-05-05T16:36:03+5:302019-05-05T16:36:46+5:30
जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव: जिल्ह्यात वेगवेगळ्या चार अपघातात पाच जण ठार झाले. शनि अमावस्येच्या दिवशी ४ रोजी काळाने ही झडप घातली. एक अपघात धरणगाव तालुक्यातील मुसळीजवळ तर दुसरा अपघात जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे झाला. तीसरा अपघात भुसावळ येथे तर चौथा अपघात हा अमळनेर तालुक्यातील आर्डी अनोरे येथे झाला.
पिंपळकोठा येथील
दोघांना ट्रकने चिरडले
भरधाव कारने ओव्हरटेक करताना दुचाकीला कट मारल्याने स्वत:ला सावरत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शोएब अली हारुन अली (२२) व दाऊद शेख रियाजोद्दीन (२१) हे दुचाकीवरील आते व मामेभाऊ जागीच ठार झाले. शनिवारी सकाळी ९ वाजता मुसळी गावाजवळ हा अपघात झाला.
टँकरखाली आल्याने
मोयगावचा मजूर जागीच ठार
जामनेर ते पहूर दरम्यान असलेल्या पिंपळगाव गोलाईत येथे टँकरखाली येवून टँकरवरील मजूर ज्ञानेश्वर बळीराम पाटील (२५) रा.मोयगांव हा जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घडली. चौपदरी रस्त्याच्या कामावर पाणी मारण्यासाठी टँकर मागे घेताना टँकर खड्डयात गेल्याने हा मजूर खाली पडून ही दुर्घटना घडली.
भुसावळला महानगरीच्या धक्क्याने रेल्वे अभियंता ठार
भुसावळ रेल्वेतील सीनियर सेक्शन इंजिनियर राजेश भीमराज मायकल (४९) यांना महानगरी एक्सप्रेसचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ४ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना भुसावळ येथे घडली.
विहीर खोदतान मजूर दबून ठार
अमळनेर तालुक्यातील आर्डी अनोरे येथे विहिर खोदताना बिपीन मुरलीधर पाटील (वय ३७ ) रा. मंगरुळ हा मजूर विहिरीचा भाग खचल्याने त्या खाली दबून ठार झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. सायंकाळी ही दुर्घटना घडली.