आयुष्यमान योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला पाच लाखाचं आरोग्य विमा कवच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 01:57 PM2018-05-16T13:57:46+5:302018-05-16T13:58:41+5:30
देशभरातील १० कोटी कुटुंबाना तर जळगाव जिल्ह्यात ३ लाख ६० हजार कुटुंबांना मिळणार लाभ
जळगाव - प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेअंतर्गत आयुष्यमान दिवस पाळण्यात येऊन या अंतर्गत लाभार्थ्यांची पडताळणी व माहिती संकलन मोहिम हाती घेण्यात आली. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार कुटुंबांना याचा लाभ मिळणार असून देशभरातील १० कोटी कुटुंबाना (५० कोटी लाभार्थी ) दरवर्षी पाच लाखाचे आरोग्य विमा कवच मिळणार आहे.
देशभरातील १० कोटी कुटुंबाना (५० कोटी लाभार्थी) आरोग्य संरक्षण पुरवण्याच्या सरकारच्या नियोजनाअंतर्गत, आरोग्य हे देशातील धोरण व राजकीय परिसंवादाचा मुख्य टप्पा बनला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लाभार्थ्यांपर्यंत परिणामकारक पद्धतीनं पोहचणे आणि त्यांना योजनेच्या तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक राबवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिली पायरी म्हणून आयुष्यमान भारत दिवस आयोजित करण्यात आला. यामध्ये ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती जमा करण्यात आली.
प्रत्येक कुटुंबास प्रती वर्ष ५ लाखाचे आरोग्य विमा संरक्षण
संकलित केलेली माहिती २१ मे पर्यंत वेबसाईट वर अपलोड केली जात आहे. लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रती वर्ष रुपये ५ लाख आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. सदर योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही रुग्णालयात रू. ५ लाखपर्यंत विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.
ग्रामीण लाभार्थी पडताळणी
या मोहिमेत दोन उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम मोहिमेचे उदिृष्टे लाभाबद्दल पात्र लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली. तर दुसरे उदिृष्टे म्हणजे विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण आणि जेथे ग्रामसेवक, आशा आणि एएनएम यांच्या माध्यमातून अतिरिक्त माहिती जमा करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम जिल्ह्यात राबविण्यात आली.
अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेमध्ये लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, कुंटुंबाच्या सद्य स्थितीमधील बद्दल माहिती संकलन करण्यात आली. लाभार्थी कुटुंबांची माहिती आशा, आरोग्य सेविकांद्वारे गृहभेटी देऊन संकलित करण्यात आली. सदर माहिती संकलित करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्यांची प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास पाच लाखाचा आरोग्य विमा मिळणार असून देशात कोणत्याही रुग्णालयात लाभ घेता येणार आहे.
- डॉ. चेतन पाटील, समन्वयक, महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना.