वडोदा वनक्षेत्रात पाच बिबटे, मानवी हल्ले मात्र अत्यल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:26 PM2020-08-28T15:26:50+5:302020-08-28T15:28:41+5:30
मानव व वन्यजीव प्राण्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे करण्यात येणारे प्रयत्न त्यांचे मानवी हल्ल्यावरचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यास यशस्वी ठरले आहेत.
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वडोदा वनविभागांतर्गत बिबट्यांची संख्या असली तरी मानव व वन्यजीव प्राण्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे करण्यात येणारे प्रयत्न त्यांचे मानवी हल्ल्यावरचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यास यशस्वी ठरले आहेत.
वनविभागाचा जनजागृतीवर भर
वडोदा वनक्षेत्र हे महाराष्ट्रातील पट्टेदार वाघांचे वास्तव्य असलेले सुप्रसिद्ध असे जंगल आहे. १४ हजार हेक्टर विस्तीर्ण अशा वनजमिनीवर पसरलेल्या या रानात बिबट्यांची संख्या तब्बल पाच आहे. वाघांचे वास्तव्य असलं तरी कोºहाळा, भोटा, सुळे, रिगाव या नदीकाठच्या गावांमध्ये त्याचे वास्तव्य दिसून येत आहे. वाघाचे वास्तव्य असल्याने बिबट्याचा वावर हा कमीच आहे. मात्र तरीदेखील मानवी वस्तीत येऊन मानवी हल्ले होऊ नयेत यासाठी वनविभागाने जनजागृती अभियान राबवले आहे. वनाचे महत्त्व, त्यासोबतच वन्यजीव प्राण्यांचे जंगलांच्या वास्तव्यासाठी असलेले महत्त्व हे जनतेला पटवून देण्यासाठी विविध प्रसंगी जनजागृती अभियान राबवले जाते. एवढेच नव्हे तर अतिशय जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये वेळोवेळी सतर्कतेचे इशारे देत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी वनविभाग तत्पर असते. माणसांनी जंगलात जाऊ नये म्हणून गॅस वाटप करण्यात आले. अत्यल्प दरात रहिवाशांना गॅस मिळत असल्याने जळाऊ लाकडांचा उपयोग इंधन म्हणून कमी झाल्याचे जाणवत आह.े
या जनजागृतीमुळे काही बोटावर मोजण्याइतके प्रकार वगळता मानव आणि वन्यजीव प्राणी यांच्यातील संघर्ष दूर ठेवण्यास आतापर्यंत वनविभागाला यश आले आहे.
आतापर्यंत बिबट्यांच्या मानवी हल्ल्याच्या केवळ चार ते पाच घटना
बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत मयत व्यक्ती झाल्याच्या घटना मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनविभागाच्या अंतर्गत तरी घडल्याचे दिसून येत नाही. चार ते पाच हल्ले बिबट्याने आतापर्यंत भोटा, कोºहाळा, सुळे आणि रिगाव या वनविभागाच्या परिसरात केलेल्या असल्या तरी त्यात कोणी दगावले नाही. भोटा शिवारात नुकतेच वासरूवर हल्ला करून ठार करण्याची घटना घडली होती. एवढेच नव्हे तर बकरीदेखील फस्त करण्यात बिबट्याला यश आले आहे. परंतु मानवी हल्ल्याच्या घटना घडलेल्या नाही.
वन्यजीव प्राणी गावात येण्यासाठी उभारल्या उपाययोजना
वन्यजीव प्राणी आणि मानवजातीतील संघर्ष हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. मात्र वडोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत अतिशय शिस्तबद्धरित्या संरक्षण योजना या राबवल्या जात असल्याने प्राणी जंगलातून गावाकडे येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाणी कमी झाल्यानंतर बिबट्या किंवा इतर तृणभक्षी प्राणी हे जंगलातून गावाकडे धाव घेत असतात. मात्र वनविभागाअंतर्गत उन्हाळ्यात पाणवठे, मातीचे बंधारे व सिमेंट बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. जेणेकरून वन्यजीव प्राणी हे जंगल सोडून बाहेर येत नाही. वडोदा वनविभागाच्या अंतर्गत १६ पाणवठे, २० वनबंधारे व जवळपास १० सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. प्राण्यांना मानवी वस्तीकडे वळण्यासाठी मज्जाव करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. एवढेच नव्हे तर चारठाणा भवानी संवर्धन क्षेत्र अंतर्गत पाच कोटी रुपये योजनेची गवत लागवड ही योजना गेल्या चार वर्षांपासून राबवली जात आहे. त्यासाठी निधी उपलब्ध नसला तरी गेल्या चार वर्षांपूर्वी गवत लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे तृणभक्षी प्राणी हे महसुली विभागात न जाता चारठाणा जंगलातच राहतात व त्यावरच मांसभक्षक प्राणीदेखील जीवन जगत असल्याने प्राण्यांचा गावाकडे येण्याचा ओढा हा क्वचित आहे.
नियमित गस्त व मेंढपाळ, स्थानिक रहिवाशी यांच्यामध्ये असलेला समन्वय यातून बºयापैकी वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण केले जात आहे. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी शिकारीसाठी आलेले बºहाणपूर भागातील काही शिकारीदेखील वन वभागाने पकडले होते.
वडोदा वनविभागात वन्यजीव प्राणी व वने यांचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला पटवून देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे मानव व वन्यजीव प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यास आम्हाला यश आले आहे. वन्यजीव प्राणी हा जंगलांचा व निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. सर्वांनी त्यांच्या संरक्षणासाठी पुढे सरसावले पाहिजे.
-अमोल चव्हाण, वनक्षेत्रपाल, वडोदा