मनपा प्रशासनाकडून पाच मोबाईल टॉवर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:51+5:302021-03-24T04:14:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महापालिका प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कराचा वसुलीसह इतर वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिका प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कराचा वसुलीसह इतर वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, मंगळवारी शहरातील पाच मोबाईल टॉवर मनपा प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. यामध्ये एका अनधिकृत मोबाईल टॉवर चा समावेश आहे.
सोमवारी महापालिकेचे प्रभाग समिती ४ चे अधिकारी उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन मोबाईल टॉवर सील करण्यात आले होते. तर मंगळवारी ५ मोबाईल टॉवर सील करण्यात आले आहेत. या पाचही मोबाईल टॉवर धारकांकडे मनपाची सुमारे १३ लाख रुपयांची थकबाकी आहे. शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर धारकांकडे मनपा ती तब्बल सात कोटी रुपयांची थकबाकी असून, यातील काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने महापालिकेची या वसुलीकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
बड्या थकबाकीदारांवर करण्यात येईल कारवाई
शहरातील मालमत्ता कराचा वसुलीसाठी महापालिकेकडून स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. शहरातील बड्या थकबाकीदारांवर महापालिकेची नजर असून, लवकरच या थकबाकीदारांना नोटिसा बजावून रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. थकबाकीदारांना ही रक्कम न भरल्यास मालमत्तांवर बोजा देखील टाकण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.