पाच महिन्यांनी कोरोना पुन्हा चारशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:21+5:302021-03-01T04:19:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसात तब्बल ४०८ रुग्ण आढळले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसात तब्बल ४०८ रुग्ण आढळले आहे. जळगाव शहरात १९१ तर चोपड्यात ५३ नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या आधी ८ ऑक्टोबर २०२० ला चारशे जास्त रुग्ण आढळले होते. कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसातील बाधितांचा आकडा चारशेपेक्षा जास्त गेला आहे. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २५०५ आहे. शहरातील एका ७२ वर्षांच्या पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
गेल्या महिनाभरापासून पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र रविवारी दिवसभरात तब्बल ४०८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शहरात १९१ रुग्ण आहेत. तर जिल्हाभरातील प्रलंबित अहवाल ३२८६ आहेत. एकूण मृत्यू १३८५ एवढे झाले आहेत. शहरात शनिवारीदेखील दीडशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी हाच आकडा १९१ वर गेला आहे. चोपडा तालुक्यात ५३ नवे बाधित आहेत. तर चाळीसगावला देखील नव्या बाधितांचा आकडा वाढला आहे.
पॉझिटिव्हिटी रेट वाढला
रविवारी तपासणीसाठी २०५० नमुने आरटीपीसीआर तपासणीसाठी पाठण्यात आले आहेत. तर १२९९ नमुन्यांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआरच्या अहवालांपैकी १९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ
सध्या ॲक्टिव्ह रुग्ण २५०५ असले तरी त्यापैकी १०२ रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल आहे. तर १३८ जणांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. लक्षणे असलेले रुग्ण ७३५ आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्याचे आव्हान यंत्रणेसमोर उभे आहे. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ही १७७० आहे.
प्रलंबित अहवालांची संख्या वाढली
कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी सध्या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कोरोना तपासणी लॅबवर ताण पडत आहे. या लॅबमध्ये दिवसाला १ हजार नमुन्यांची तपासणी केली जाऊ शकते. सध्या त्यापेक्षा जास्त नमुने येत असल्याने प्रलंबित अहवालांची संख्या देखील वाढली आहे. शनिवारी २७६० अहवाल प्रलंबित होते. तर रविवारी हाच आकडा ३२८६ वर गेला होता. हे अहवाल सोमवारी किंवा मंगळवारी येऊ शकतात. त्यामुळे यंत्रणेची धाकधूक वाढली आहे.