एसटी बसचालकाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 05:36 PM2019-04-09T17:36:15+5:302019-04-09T17:37:40+5:30
वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
भुसावळ, जि.जळगाव : वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. त्यामुळे वरणगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मेहकर आगाराची बस (क्रमांक एमएच-४०-एन-८७९२) ही जळगाव ते लोणार जात होती. या बसचा फुलगाव फाट्याजवळ भुईमुगाचा पाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कट लागला, असा आरोप करून ट्रॅक्टरवरील समाधान भास्कर कोळी रा.अंजनसोडा, प्रमोद इंगळे रा.ओझरखेड, सुरेश देवराम पाटील रा.ओझरखेड, संदीप उर्फ मनू रामा इंगळे रा.ओझरखेड व जयेश सारंगधर पंडित पाटील रा.साकेगाव यांनी एस.टी.बसला वरणगाव येथील देशमुख पेट्रोल पंपाजवळ ओव्हरटेक करून बस थांबवली. यानंतर बसचालक प्रकाश नारायण मस्के (वय ४०) रा.प्रतापपूर, ता.मेहकर, जि.बुलढाणा यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी बसवाहक वैभव माणिकराव शिरसाट यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यावरून या पाच जणांविरुद्ध गु.र.नं. ५७/११, भा.दं.वि. कलम ३३२, ३५३, ३४१, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. १२ जून २०११ मध्ये ही घटना घडली होती.
मात्र उपचारादरम्यान चालक प्रकाश मस्के यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वरणगाव पोलीस स्टेशनला या कलमांमध्ये पुन्हा ३०२ कलम वाढवण्यात आले. तपास एपीआय पाचोरकर यांनी केला होता.
यासंदर्भात नऊ साक्षीदार तपासण्यात आले, तर डॉ.पंकज सैदाणे यांनी शवविच्छेदन केले होते. आरोपींविरुद्ध साक्षीदार महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे या पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅड.प्रवीण पी. भोंबे, मुक्ताईनगर यांनी कामकाज पाहिले. आरोपींतर्फे अॅड.सागर चित्रे, अॅड.मोझ, अॅड.प्रफुल्ल पाटील, अॅड.कैलास लोखंडे यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून शहर पोलीस ठाण्याच्या पो.हे.कॉ.समीना तडवी यांनी मदत केली.